गोव्यात ‘इफ्फी’चा पडदा आज उघडणार | पुढारी

गोव्यात ‘इफ्फी’चा पडदा आज उघडणार

पणजी; पुढारी वृत्तसेवा : गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होणार आहे. यंदाच्या 54 व्या ‘इफ्फी’साठी गोवा सज्ज झाला आहे. आपत्कालीन सेवा व सुरक्षेच्या द़ृष्टीने उच्चस्तरीय खबरदारी घेण्यात आली आहे. महोत्सवाचे उद्घाटन 20 रोजी सकाळी 8 वाजता होणार आहे.

चित्रपट महोत्सवातील पहिल्या चित्रपटाने उद्घाटन सोहळा संपन्न होईल. ‘इफ्फी’च्या उद्घाटनाला अभिनेता शाहिद कपूर, माधुरी दीक्षित-नेने, श्रेया सरन यांच्यासह अनेक दिग्गज राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कलाकार उपस्थित राहणार आहेत. मास्टर क्लाससाठी यंदा खास हॉलीवूड स्टार मायकल डग्लस यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच ज्युरी प्रमुख म्हणून ज्येष्ठ अभिनेते व चित्रपट निर्माता शेखर कपूर
यांची निवड झाली आहे. ‘इफ्फी’मध्ये वर्ल्ड प्रीमियर, इंटरनॅशनल प्रीमियर, एशियन प्रीमियर तसेच इंडियन प्रीमियरमधील दर्जेदार चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. तसेच गाला प्रीमियरमध्ये खास सलमान खान, सनी देओल उपस्थित राहणार आहेत.

उद्घाटन, समारोप स्थळ एकच…

54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महात्सवाचे उद्घाटन आणि समारोप सोहळा ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर होणार आहे. याव्यतिरिक्त आयनॉक्स, मॅकेनीझ पॅलेस आणि पर्वरी येथील आयनॉक्समध्ये चित्रपट दाखवण्यात येणार आहे. याशिवाय कला अकादमीत मास्टरक्लास होणार आहे. तर मिरामार समुद्रकिनारी, हणजूण येथे समुद्रकिनारी व मडगावच्या रवींद्र भवन येथे खुला पडदा लावण्यात येणार आहे.

Back to top button