पणजी : महसूल मंत्री बाबूश मोंसेरात यांच्यासाठी प्रतिष्ठेची असलेल्या ताळगाव पंचायतीची सार्वत्रिक निवडणूक रविवारी (दि. २८) पार पडली. या निवडणुकीत मतदानाचा टक्का मागच्या निवडणुकीच्या तुलनेत घसरला आहे. मागच्यावेळी ७०.३९ टक्के मतदान झाले होते, तर यावेळी ६८.७९ टक्के मतदान झाले. ११,९८८ मतदारांपैकी ८२६६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
ताळगाव पंचायतीच्या ११ पैकी ४ जागांवरील उमेदवार बिनाविरोध निवडून आल्याने ७ जागांसाठी मतदान झाले. या सर्व उमेदवारांचे भवितव्य पेटीत बंद झाले असून मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने होता, हे सोमवारी (दि.२९) मतमोजणी दरम्यान स्पष्ट होणार आहे.
प्रभाग क्र.२ मधून आग्नेलो द कुन्हा आणि डोमिंगोस दा कुन्हा, प्रभाग क्र.३ मधून एमी रॉड्रिग्ज व हेलेना परेरा, प्रभाग क्र.४ मधून माधवी काणकोणकर व रतिका गावस, प्रभाग क्र. ५ मधून दिशा मुरगावकर व उशांत काणकोणकर, प्रभाग क्र.७ मधून जानू रोझारियो व विजू दिवकर, प्रभाग क्र. ८ मधून इमॅन डायस व मारिया फर्नांडिस तर प्रभाग क्र.९ मधून संजना दिवकर आणि वनिता वेळुस्कर हे निवडणूक रिंगणात होते.
सकाळपासून सगळ्या प्रभागात मतदारांचा उत्साह जाणवला. उन्हाच्या तडाख्यातही मतदान करण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळच्या सत्रात मतदान संथ गतीने सुरू होते. दुपारी २ पर्यंत ५० टक्के मतदान झाले. उर्वरित २० टक्के मतदान शेवटच्या ३ तासात झाले. सकाळी ८ ते १२ या वेळेत ३३.४७ टक्के मतदान झाले. १२ ते २ या वेळेत ४९.८५ टक्के, २ ते ४ या वेळेत ६२.३७ तर ४ ते ५ या वेळेत ६८.७९ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान (८०.१६ ) प्रभाग क्रमांक. ७ मध्ये तर सर्वात कमी मतदान (५६.८५) प्रभाग क्रमांक. ३ मध्ये झाले. कामराभाट येथील प्रभाग क्रमांक २ मध्ये ३ क्रमांकाचे मतदान (७०.९८) झाले.
प्रभाग निहाय मतदान टक्केवारी
प्रभाग २: ७०.९८
प्रभाग ३: ५६.८५
प्रभाग ४: ६९.६८
प्रभाग ५: ७६.१४
प्रभाग ७: ८०.१६
प्रभाग ८: ६२.१०
प्रभाग ९: ६९.३७
हेही वाचा :