गोव्याची आणखी सहा पदके निश्चित; मुष्टीयोद्ध्यांची अंतिम फेरीत धडक | पुढारी

गोव्याची आणखी सहा पदके निश्चित; मुष्टीयोद्ध्यांची अंतिम फेरीत धडक

विवेक कुलकर्णी

पणजी :  37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत यजमान गोव्याला आणखी सहा पदके निश्चित झाली आहेत. या स्पर्धेतील अवघे दोन दिवस शिल्लक असताना मंगळवारी गोव्याच्या सहा मुष्टियोद्ध्यांनी उपांत्य सामने जिंकत अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे यजमान संघाच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत.

राष्ट्रीय चॅम्पियन सानामाचा चानू हिने दिवसाच्या प्रारंभी कर्नाटकाच्या राधिकाविरुद्ध अगदी धडाकेबाज खेळ साकारला आणि तिचे आक्रमण इतके लक्षवेधी होते की, रेफ्रींना पहिल्याच फेरीत खेळ थांबवत चानूला विजयी घोषित करणे भाग होते. महिलांच्या मिडलवेट गटात ती आता सुवर्णपदकासाठी पुन्हा एकदा महत्त्वाकांक्षेने बॉक्सिंग रिंगमध्ये उतरेल. माजी विश्व युवा चॅम्पियन साक्षी चौधरीनेही आपली आगेकूच कायम ठेवताना महिलांच्या लाईट फ्लायवेटमध्ये अंतिम फेरी गाठली. तिने उपांत्य फेरीत मणिपूरच्या आशालता चानूला 5-0 अशा एकतर्फी फरकाने पराभवाचा धक्का दिला. निहारिकाचे आव्हान मात्र पंजाबची ऑलिम्पियन सिमरनजीत कौरने संपुष्टात आणले.

पुरुषांच्या गटात आकाश गोरखा, रजत, लोकेश व गौरव चौहान यांनीही अंतिम फेरी गाठली तर एके जमीर रोशन व साई आयुष यांचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. पुरुषांच्या लाईट वेल्टर वेट गटात आकाशने महाराष्ट्राच्या यश राजूविरुद्ध 5-0 अशा फरकाने बाजी मारली. आता सुवर्णपदकासाठी त्याची लढत ऑलिम्पियन मनीष कौशिकविरुद्ध होईल. सुपर हेवी वेट गटातील उपांत्य फेरीत गोव्याच्या गौरव चौहानने मध्य प्रदेशच्या अमन सिंगचे आव्हान संपुष्टात आणणे लक्षवेधी ठरले.

Back to top button