Goa News : माध्यान्ह आहार पुरविणार्‍या गटाचा परवाना निलंबित | पुढारी

Goa News : माध्यान्ह आहार पुरविणार्‍या गटाचा परवाना निलंबित

पणजी; पुढारी वृत्तसेवा :  माध्यान्ह आहारात अळ्या मिळाल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने आहार पुरवणार्‍या स्वयंसाहाय्य गटाचा परवाना निलंबित केला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत स्वयंसाहाय्य गटांनी दर्जेदार आहार न पुरवल्यास अक्षयपात्र संस्थेला कंत्राट देण्याचा पर्याय सरकारसमोर असल्याचा इशारा दिला आहे.

राज्यातील महिला स्वयंसाहाय्य गटांना शाळातील विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहार पुरवण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. त्यांनी माध्यान्ह आहाराचा दर्जा चांगला ठेवावा. विद्यार्थ्यांना सकस आहार न दिल्यास सरकारला ‘अक्षयपात्र’चा पर्याय स्वीकारणे भाग पडेल, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिलो. सावईवेरे शाळेत माध्यान्ह आहारात सापडलेल्या अळ्यांचा प्रश्न मुख्यमंत्र्याना विचारला असता ते म्हणाले, सदर शाळेत माध्यान्ह आहार पुरविणार्‍या स्वयंसाहाय्य गटाला तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे. स्वयंसाहाय्य गटांनी विद्यार्थ्यार्ंंच्या जीवाशी खेळू नये. त्यांना दर्जेदार व सकस आहार द्यावा. नपेक्षा सरकार अक्षयपात्र या संस्थेला माध्यान्ह आहाराचे कंत्राट देण्याचा विचार करू शकते.

सरकारला राज्यातील महिला स्वयंसाहाय्य गटांनाच माध्यान्ह आहार पुरवण्याचे कंत्राट द्यायचे आहे. गेली अनेक वर्षे हे कंत्राट स्वयंसाहाय्य गटांनाच दिले गेले आहे. मात्र, माध्यान्ह आहाराचा दर्जा गटांनी सांभाळणे गरजेचे आहे. सावईवेरे शाळेत माध्यान्ह आहारात अळ्या सापडल्याचे कळताच शिक्षण संचालकाशी आपण चर्चा करून त्वरित कारवाईचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी योग्य ती चौकशी करून कारवाई होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

’एफडीए’चा अहवाल आल्यावर कारवाई : झिंगडे

सदर घटनेची शिक्षण खात्याने गंभीर दखल घेतली आहे. ’एफडीए’ला माध्यान्ह आहाराच्या नमुन्यांची तपसणी करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार महिला उत्कर्ष गटाचा परवाना निलंबित करण्याचा निर्णय घेतला. ‘एफडीए’कडून याबाबतचा अहवाल 14 दिवसांत शिक्षण खात्याला देण्यात येईल. त्यानंतर शिक्षण खाते संबंधित गटावरील कारवाईबाबत निर्णय घेईल, असे शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी सांगितले.

40 शाळांना आहार पुरविण्याचे कंत्राट

सावईवेरे केरी परिसरातील सुमारे 40 शाळांना माध्यान्ह पुरवण्याचे कंत्राट मंगेशी येथील महिला उत्कर्ष स्वयंसाहाय्य गटाकडे आहे. दोन दिवसांपूर्वी या गटाने दिलेल्या माध्यान्ह आहारात अळ्या सापडल्या होत्या. त्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई करत या गटाचा परवाना निलंबित केला, अशी माहिती ‘एफडीए’च्या संचालक ज्योती सरदेसाई यांनी गुरुवारी दिली.

Back to top button