

पणजी; पुढारी वृत्तसेवा : बंगळुरू-पणजी महामार्गावर आगशी येथे गुरुवारी (दि. ७) सकाळी कर्नाटकातील खासगी स्लीपर बस उलटून दहा प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली.
भरधाव वेगात असलेली बस दुभाजकावर चढली आणि एका बाजूने कोसळली. कर्नाटकातून गोव्यात येणारी ही बसगाडी (केए-01 एजे-2462) सकाळी आगशी येथे उलटली असता त्यात बसमधील इतरही प्रवासी किरकोळ जखमी झाले. जखमी प्रवाशांना उपचारासाठी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल करण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना गोमेकॉत दाखल केले. चालकाला डुलकी लागल्याने अपघात झाल्याची चर्चा प्रवासीवर्गात होती. दरम्यान, अपघातात बसच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. या प्रकरणी आगशी पोलिस पुढील तपास करत आहेत.