पणजी : अर्धवेळ शिक्षकांना पगारवाढीची दिवाळीभेट पण… | पुढारी

पणजी : अर्धवेळ शिक्षकांना पगारवाढीची दिवाळीभेट पण...

पणजी, पुढारी वृत्तसेवा : सेवेत नियमित करण्यात यावे आणि पूर्णवेळ शिक्षकांना मिळणाऱ्या सर्व सुविधा मिळाव्यात, या मागणीसाठी गेल्या ८ दिवसांपासून सुरु असणारे अर्धवेळ शिक्षकांचे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज (दि.३) आझाद मैदानावर शिक्षकांची भेट घेतली. ४ एप्रिल २०२० ते ३० एप्रिल २०२१ या कालावधीत १६,१२५ रु वरून २२,००० रु पगारवाढ आणि जून २०२१ पासून २५,००० इतकी पगारवाढ देण्यात येईल असे पत्र मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या स्वाधीन केले.या शिक्षकांचे कंत्राट हे १२ महिन्यांचे केले जाईल, असेही सांगितले. त्यांनी शिक्षकांना आंदोलन मागे घेण्यास सांगितले. मात्र सेवेत नियमित करण्याच्या मुद्द्यावर कायद्याच्या अडचणी आहेत असे सांगितले. दिवाळीनंतर प्रत्यक्ष भेटून यावर तोडगा काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

“पगारवाढ ही आमची मागणी होती, मात्र त्यासोबतच आम्हाला सेवेत नियमित करण्यात यावे ही आमची मुख्य मागणी होती. मात्र या मागणीबाबत मुख्यमंत्र्यांनी नकार दिला आहे. ते प्रत्यक्ष इथे येऊन आम्हाला आंदोलन थांबविण्याची विनंती करून गेले आहेत. त्यांच्या  विनंतीचा मान ठेवून आम्ही आमचे आंदोलन तात्पुरते स्थगित करत आहोत. मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे दिवाळीनंतर आम्ही त्यांना भेटू व पुन्हा एकदा आमच्या मागण्या त्यांच्यासमोर ठेवू. जर समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही तर पुन्हा आंदोलन करू”, असे शिक्षक असणारे गजानन लांबोर यांनी सांगितले.

“आम्ही सर्व शिक्षक पूर्णवेळ शिक्षकांइतकेच काम करतो. आमचे शिक्षणही त्यांच्याइतकेच आहेत. त्यांच्याकडे असणारी सर्व कौशल्येही आमच्याकडे आहेत. त्यामुळे आमच्या मागण्या अगदी रास्त आहेत. त्यामध्ये आम्ही कोणतीच तडजोड करणार नाही”, असेही त्यांनी पणजी येथे सांगितले.

Back to top button