गोवा : संसार फुलण्यापूर्वीच तिघांवर काळाची झडप

गोवा : संसार फुलण्यापूर्वीच तिघांवर काळाची झडप

मडगाव; पुढारी वृत्तसेवा :  प्रेमाला कसलेच वयाचे बंधन किंवा धर्माच्या मर्यादा नसतात. रेखा विवाहित होती. तिला एक मुलगीही होती; पण मिलिंदने समाजाची पर्वा न करता तिला आधार दिला. तिच्याशी विवाह केला. त्यांना दिव्यांशच्या रूपाने एक गोडस बाळसुद्धा झाले होते. पण, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. संसाराच्या वेलीवर फूल फुलण्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर झडप घातली. मुलीच्या हाताचे जेवण जेवण्यासाठी पत्नी आणि मुलासह कुयणामळ येथे गेलेल्या मिलिंदच्या कुटुंबाचा संगमेश्वर नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर म्हारांगण येथील स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

बेपत्ता असलेल्या मिलिंदचा मृतदेह अपघात झाला त्याठिकाणापासून अवघ्याच काही अंतरावर पाण्यात आढळला. मिलिंद हा मूळ म्हारांगण येथील रहिवासी आहे. फॅब्रिकेशनचे काम करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. रेखा ही विवाहित होती. तिला अठरा वर्षांची मुलगी आहे. काही कारणांमुळे रेखा आपल्या पतीपासून विभक्त झाली होती. तिच्यापेक्षा वयाने लहान असूनसुध्दा मिलिंद तिचा आधार बनला होता. तीन वर्षांपूर्वी त्याने रेखाशी विवाह करून संसार थाटला होता. त्यांना दिव्यांशच्या रूपाने एक मुलगाही झाला होता. पण नियतीला काही वेगळेच मंजूर होते.

कुयणामळ येथील बिर्‍हाडाची खोली लहान असल्याने तो बायको मुलासह काकोडा येथे रहायला होता. तर रेखा हिची मोठी मुलगी कुयणामळ येथील आपल्या आजोबांच्या घरी राहात होती. आपल्या मुलीला भेटण्यासाठी मिलिंद वरचेवर तिथे येत होता. सोमवारी रेखाच्या वडिलांची तब्येत बिघडली होती. त्यांची विचारपूस करण्यासाठी काही नातेवाईक त्यांच्या घरी आले होते. त्या निमित्ताने राखी हिच्या मोठ्या मुलीने घरी जेवण बनवले होते आणि आई-वडिलांना व लहान भावाला तिने जेवायला बोलावले होते. परत निघताना मिलिंद, राखी आणि मुलगा दिव्यांश त्या गाडीमध्ये होते. तर मिलिंद हा स्वतः गाडी चालवत होता. काकोडा येथे पोचल्यानंतर त्यांचा फोन येणे अपेक्षित होते. त्यांनी फ़ोन न केल्याने आपण त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण कोणाचाही फ़ोन लागला नाही. दरम्यान, कोणीतरी तारीपांटो पुलावरून संगमेश्वर नदीत गाडी कोसळल्याची माहिती दिली. ती गाडी आपल्या आईची होती अशी जबानी तिने पोलिसांना दिली आहे. ही कार आपल्या आखातात असलेल्या मामाची आहे. पण आई रेखाला ती गाडी चालवता येत नव्हती. वडील मिलिंद हेच ती गाडी चालवत होते, असेही तिने सांगितले.

दहा वाजता आढळला मृतदेह

मंगळवारी सकाळी दहाच्या दरम्यान अग्निशामक दलाला मिलिंदचा मृतदेह अपघात घडला त्या ठिकाणी पाण्यात तरंगताना आढळला. अग्निशमन दलाने मृतदेह शोधला नसता तर पाण्याच्या प्रवाहासह तो वाहून गेला असता, अशी माहिती पोलिस निरीक्षक प्रवीण गावस यांनी दिली.

दरवाजे लॉक असताना मृतदेह बाहेर कसा?

ज्यावेळी कार बाहेर काढली त्यावेळी गाडीचे सर्व दरवाजे बंद होते आणि खिडक्या अर्धवट उघडलेल्या होत्या. माय आणि लेकाचा मृतदेह आत अडकला होता, अशा स्थितीत मिलिंदचा मृतदेह बाहेर कसा पडला याबाबत गुंतागुंत वाढली आहे. कार सापडली त्याच्या काही अंतरावर मिलिंदचा मृतदेह पाण्यात आढळला. पोलिस निरीक्षक प्रवीण गावस यांनी 'पुढारी'शी बोलताना मिलिंदच्या मोबाईलचे नेटवर्क लोकेशन त्याच ठिकाणी सर्वात शेवटी सापडले होते, अशी माहिती दिली.

मिलिंद कुयणामळ येथे पोहोचलाच नाही…

मिलिंद नाईक यांचे नातेवाईक आणि केपेचे नगरसेवक दयेश नाईक यांनी 'पुढारी' जवळ बोलताना मिलिंद आपल्या पत्नी-मुलासह कुयणामळ येथे जाण्यासाठी निघाला होता; पण तो तिथे पोहोचलाच नाही, असा दावा केल्याने या विषयाला वेगळेच वळण मिळाले आहे. ती तिघेही कुयणामळ येथे रेखाच्या वडिलांच्या घरी पोहोचण्यापूर्वीच त्यांच्या कारला अपघात झाला असे ते म्हणाले. कुयणामळ येथे जाण्यासाठी निघालेली त्यांची कार अर्ध्या वाटेवरून वळसा घेऊन परत का आली, हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news