गोव्यात मुसळधार पाऊस! पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट, पंचवाडी धरण ओव्हरफ्लो | Goa Heavy Rain

गोव्यात मुसळधार पाऊस! पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट, पंचवाडी धरण ओव्हरफ्लो | Goa Heavy Rain

पणजी; पुढारी वृत्तसेवा : गोव्यात कोसळत असलेल्या मुसळधार (Goa Heavy Rain) पावसामुळे पंचवाडी धरण पूर्ण भरले आहे. त्यापाठोपाठ साळावली धरणही पूर्ण भरण्याच्या मार्गावर आहे. अंजुणे वगळता इतर धरणांतील पाणीसाठ्यातही मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या इशार्‍यानुसार, बुधवारीही (दि. १९) सकाळपासून मुसळधार पाऊस कायम राहिला. मंगळवारपासून आतापर्यंत राज्यात सुमारे ७ इंच पावसाची नोंद झालेली आहे. तर, १ जून ते १९ जुलै या मान्सून कालावधीत ७३ इंचांपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. सरासरी पावसाच्या तुलनेत हा पाऊस जवळपास १४ टक्के अधिक आहे. हवामान विभागाने आजपासून पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी केलेला असून, शुक्रवारपर्यंत (दि. २१) मुसळधार पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे. (Goa Heavy Rain)

दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे राज्यभरातील जनजीवन पुन्हा एकदा विस्कळीत झालेले आहे. शहरी भागांतील मुख्य तसेच अंतर्गत रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत. अनेक ठिकाणी झाडे घरे तसेच वीवाहिन्यांवर कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अनेक ठिकाणी झाडे रस्त्याच्या मधोमध पडल्याने त्याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर झालेला आहे. अग्निशामक दलाचे जवान अथक परिश्रम करून ही झाडे रस्त्यांतून हटवून रस्ते रहदारीस मोकळे करत आहेत.

दरम्यान, सांगे, केपे, मडगाव, म्हापसा या भागांमध्ये पावसाने धुमाकूळ घातलेला आहे. आतापर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद सांगे (८१ इंच) येथे झालेली आहे. त्यानंतर केपे (८० इंच), मडगाव (७८ इंच), म्हापसा (७३ इंच), वाळपई (७१ इंच) या केंद्रांचा क्रमांक लागतो.

धरणांतील पाणीसाठा

साळावली : ९७ टक्क्यांपेक्षा अधिक
अंजुणे : ३६ टक्के
आमठाणे : ८६ टक्के
पंचवाडी : १०० टक्के
चापोली : ७५ टक्क्यांपेक्षा अधिक
गावणे : ९३ टक्के
तिलारी : ६० टक्क्यांजवळ

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news