कृषी दिन विशेष : गोवा राज्यात १३,३०० हेक्टर जमीन पडीक | पुढारी

कृषी दिन विशेष : गोवा राज्यात १३,३०० हेक्टर जमीन पडीक

पणजी; पुढारी वृत्तसेवा :  राज्यात ओलिताखालील एकूण सुमारे 13,300 हेक्टर जमीन विविध कारणांमुळे गेल्या अनेक वर्षांपासून या जमीन पडीक ठेवण्यात आल्या आहे. प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, 2021-22 उत्तर गोव्यात लागवडी योग्य 9,344 हेक्टर, तर दक्षिण गोव्यातील 3,912 हेक्टर अशी मिळून 13,256 हेक्टर जमीन गेल्या तीन वर्षांपासून पडीकच होती. त्यानंतर त्यात वाढ होऊन आतापर्यंत सुमारे 13,300 हेक्टर जमीन ओलिताखाली असल्याची माहिती समोर आली आहे.

अधिक खर्च येत असल्याने उत्तर गोव्यातील 3,195 हेक्टर जमीन कायमची पडीक आहे. तर 6,149 हेक्टर जमीन गेल्या पाच वर्षांपासून पडीक आहे. दक्षिण गोव्यातील 1,586 हेक्टर जमीन अधिक खर्च येत असल्याने कायमची, तर 2,326 हेक्टर जमीन गेल्या पाच वर्षांपासून पाच वर्षांपासून पडीक आहे.

सरकारने स्वयंपूर्ण गोवा मोहिमेंतर्गत कृषी क्षेत्राला केंद्रस्थानी ठेवल्यानंतर राज्यातील कृषी, उत्पादन वाढीसाठी सरकारचे प्रयत्न सुरूच आहे. असे असतानाच लागवडीयोग्य पडीक क्षेत्रात वाढ होत आहे. तसेच स्वयंपूर्ण गोवाचा भाग म्हणून लागवडी योग्य पडीक जमीन ताब्यात घेऊन ती कंत्राटी पद्धतीवर इतर शेतकर्‍यांना देण्यासंदर्भातील कायदा दुरुस्ती होण्याचे संकेत काही दिवसांपूर्वी जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिले होते. त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही याबाबत कृषी अधिकार्‍यांची बैठक घेतल्यानंतर लागवडीयोग्य पडीक जमिनी ताब्यात घेण्याच्या हालचाली सरकार पातळीवरून सुरू असल्याचे समोर आले होते. यावरून राज्यभरात खळबळ माजलेली असतानाच, लागवडीयोग्य 13,300 हेक्टर जमीन राज्यात पडीक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान , या पडीक जमिनी सरकारने ताब्यात घेऊन युवकांकडून कसण्यासाठी द्याव्यात.तसेच शेती पिकवण्यासाठी त्यांना आवश्यक ते सहकार्य केले आणि कंत्राटी शेतीला चालना दिली, तर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या स्वप्नातील स्वयंपूर्ण गोवा निश्चितच प्रत्यक्षात उतरेल अशा प्रतिक्रिया राज्यांतील प्रगतशील शेतकर्‍यांकडून येत आहे.

राज्यात पडीक असलेली जमीन

(हेक्टरमध्ये)

तिसवाडी : 3,732
बार्देश : 3,118
पेडणे : 1,489
डिचोली : 931
सत्तरी : 74
फोंडा : 546
सांगे : 295
काणकोण : 251
केपे : 167
सासष्टी : 2,352
मुरगाव : 301

Back to top button