गोव्यात दोन आठवडे मुसळधार पावसाची शक्यता | पुढारी

गोव्यात दोन आठवडे मुसळधार पावसाची शक्यता

पणजी; पुढारी वृत्तसेवा :  मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाल्याने हवामान खात्याने शुक्रवारपासून (दि. 23) 6 जुलै या दोन आठवड्यांत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. या दोन्ही आठवड्यांत सर्वसामान्य पावसापेक्षा 20 ते 59 टक्के जास्त पाऊस पडू शकतो, असेही खात्याने स्पष्ट केले आहे.

राज्यात 11 जून रोजी मान्सून दाखल झाला असला तरी समाधानकारक पाऊस झालेला नाही. यामुळे धरणातील पाणीसाठा कमी झाला असून, पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. पुढील दोन आठवड्यांत चांगला पाऊस पडल्यास पाणीसाठा वाढणार आहे. एक जूनपासून राज्यातील एकूण पावसामध्ये 72.4 टक्क्यांची तूट आहे.खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 24 ते 29 जून दरम्यान, दिवसाला 40 मि.मी.पर्यंत तर 30 जून ते 6 जुलै दरम्यान दिवसाला 70 मि.मी. पाऊस पडण्याची शक्यता आहे. 29 जूनपर्यंत कमाल तापमानात 2 अंश से. वाढण्याची तर त्यानंतर त्यामध्ये 2 अंश से. घट होण्याची शक्यता खात्याने वर्तवली आहे. दरम्यान, गुरुवारी राज्यात ठिकठिकाणी पावसाची नोंद झाली. डिचोली, वाळपई, साखळी, मडगाव, काणकोण भागांत पावसाने हजेरी लावली. वाळपईत सर्वांत अधिक 61.5 मि.मी. पावसाची नोंद झाली.

Back to top button