गोव्यात मधुमेहामुळे प्रतिदिनी सरासरी तिघांचा मृत्यू | पुढारी

गोव्यात मधुमेहामुळे प्रतिदिनी सरासरी तिघांचा मृत्यू

पणजी; गायत्री हळर्णकर :  राज्यात गेल्या पाच वर्षांत मधुमेहामुळे 4 हजार 881 जणांचा मृत्यू झालेला आहे. या आजारामुळे दर दिवशी सरासरी 3 जणांचा मृत्यू होत असल्याची माहिती सरकारने जाहीर केलेल्या एका अहवालातून समोर आली आहे. या आजाराचे प्रमाण महिलांपेक्षा पुरुषांमध्ये अधिक असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत 2 हजार 795 पुरुष, तर 2 हजार 86 महिलांचा मृत्यू झाला आहे.

मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी 40 वर्षांनंतर प्रत्येकाने रक्त तपासणी करणे गरजेचे आहे. सुरुवातीची लक्षणे दिसून येताच डॉक्टरांचा सल्ला घेणे हिताचे ठरते. तसेच पौष्टिक आहार गरजेचा आहे, असे डॉ. मेघना देसाई यांनी सांगितले.

मधुमेह म्हणजे काय ?

मधुमेह शरीरातील अंतर्गतस्रावांच्या विस्कळीतपणामुळे उद्भवणारा सामान्य आजार आहे. जो कुठल्याही वयाच्या व्यक्तींना होऊ करतो. रक्त प्रवाहातील अति रक्तग्लुकोझच्या पातळीवरून याचे निदान केले जाते. मधुमेहाची विभागणी मुख्यतः प्रकार 1 आणि प्रकार 2 अशी केली गेली आहे. किशोरवयीन, गर्भधारणेसंबंधी व प्रीडायबिटीस अशा इतर विभागण्या केल्या जातात. वेळीच उपचाराला सुरुवात न केल्यास गंभीर आजार होण्याची शक्यता निर्माण होते.

मधुमेहाची लक्षणे…

मधुमेहाच्या रुग्णांमधे मूत्रविसर्जनास वारंवार जावे लागणे, थकवा, सतत तहान आणि भूक लागणे, वजन कमी होणे अशी लक्षणे दिसतात. यावर उपाय म्हणजे खाण्याच्या सवयी बदलणे, तोंडाने घ्यावयाची औषधे,आणि काही रुग्णांमध्ये जास्त मधुमेह सापडल्यास दररोज इन्शुलीनचे इंजेक्शन घेणे, यासोबतच दररोज व्यायाम करणे हा देखील एक महत्त्वपूर्ण उपचार आहे. जीवनशैलीतील बदल, औषधोपचार, व्यायाम आणि काही उपचार पद्धतींच्या मदतीने या आजाराला सुरुवातीच्या टप्प्यातच अटकाव करून मधुमेहाचे यशस्वीपणे नियोजन केले जावू शकते, असे मेघना देसाई यांनी सांगितले.

मधुमेही रुग्णांचे मृत्यू

वर्ष         मृत्यू
2017     681
2018     871
2019     822
2020    1,328
2021    1,178

Back to top button