

पणजी; पुढारी वृत्तसेवा : जी-20 परिषदेच्या आरोग्य कार्यकारी गटाची बैठक बांबोळी येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सोमवार, दि. 17 ते 19 एप्रिल या कालावधीत होणार आहे. बैठकीला जी-20 च्या 20 सदस्य देशांसह अन्य 10 देशांतील सुमारे 180 प्रतिनिधी उपस्थित राहतील, अशी माहिती केंद्रीय अतिरिक्त आरोग्य सचिव लव अग्रवाल यांनी रविवारी पणजीतील पत्रकार परिषदेत दिली.
अग्रवाल यांनी सांगितले, या बैठकीत प्रामुख्याने तीन मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे. यामध्ये पहिला विषय 'जागतिक स्तरावरील आरोग्य विषयक आपत्कालीन स्थितीला प्रतिबंध करणे, याबाबत सज्जता बाळगणे आणि उपचार शोधणे' हा आहे. दुसरा मुद्दा 'दर्जेदार किफायतशीर आणि प्रभावी उपचार पद्धती आणणे' हा असेल. यात औषधांची उपलब्धता सुगम्य करून ती मजबूत करणे यांचा समावेश आहे. तर तिसर्या मुद्दयात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून जागतिक, देशातील आरोग्य सेवा सुधारण्यात मदत करणे आहे.