गोव्यात पाच वर्षांत कोट्यवधींचे सोने जप्त

गोव्यात पाच वर्षांत कोट्यवधींचे सोने जप्त
Published on
Updated on

मडगाव; रविना कुरतरकर :  भारतात सोन्याच्या किमतीने प्रती 10 ग्रॅम 58 हजार रुपयांचा टप्पा पार केला आहे. या पार्श्वभूमीवर गोव्यातही सोन्याच्या तस्करीचे नवे प्रकार अलिकडच्या काळात उघडकीस आले आहेत. मागील पाच वर्षांत उत्तर गोव्यातून 2 कोटी 33 लाख 8,481 रुपये किमतीचे तर दक्षिण गोव्यातून 2 कोटी 21 लाख 760 रुपये किमतीचे सोने जप्त करण्यात आले आहे.

भारत हा चीननंतर जगातील दुसर्‍या क्रमांकाचा सोन्यासाठीचा ग्राहक आहे. भारत मोठ्या प्रमाणात सोन्याची आयात करतो. पण भारतात सोन्याच्या तस्करीचेही प्रमाण वाढले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नववर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांच्या आत दक्षिण गोव्यात 16,26,800 किमतीचे सोने तर उत्तर गोव्यातून 2,80,000 किमतीचे सोने जप्त करण्यात आले आहे. या पाच वर्षांच्या सोन्याच्या तस्करीचा आढावा घेतला असता. 2019 मध्ये सर्वात जास्त गोव्यात झालेली आहे.

गोवा कस्टम विभागातून प्राप्त झालेल्या महितीनुसार, सोन्याची तस्करी करण्यासाठी, तस्कर महिलांचा वापर करत आहेत. हे 2019 मधील एका प्रकरणातून समोर आले. विदेशी महिलांनी त्यांनी त्यांच्या अंर्तवस्त्रात घालून सोन्याच्या दागिन्यांची तस्करी केली होती. विमानतळावर तिची तपासणी केली असता तिच्याकडून 1 किलो 787 ग्रॅम दागिने जप्त केले होते. या महिला तजाकीस्तान येथून दुबईमार्गे दाबोळी विमानतळावर उतरल्या होत्या. त्या दागिने घेऊन गोव्यात उतरल्याची माहिती कस्टम विभागाला मिळाली होती.

2019 मध्ये अशाच एका सोन्याच्या तस्करीमध्ये गोवा ते पुणे दरम्यान विमानातून सोन्याची तस्करी करणार्‍या एका महिलेला सीमा शुल्क विभागाच्या (कस्टम) अधिकार्‍यांनी पकडले होते. या महिलेकडून 18 लाख 90 हजार रुपये किमतीचे 557 ग्रॅम सोन्याची चार बिस्किटे जप्त केली होती. ही सोन्याची बिस्किटे बुटात गुंडाळून ठेवली होती. या सोन्यावर सिंगापूरचा हॉलमार्क होता. हे सोने बॅँकॉक ते कोलकाता विमानाने आणले असावे, अशी शक्यता सीमा शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी वर्तविली होती.

मागील तीन वर्षांत गोव्यात सोने तस्करीच्या 36 घटना उघडकीस आल्या. त्यात सुमारे 31 कि.ग्रॅ. सोने जप्त करण्यात आले. दरवर्षी अशा घटनांत वाढच होत असल्याचे केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेतील लेखी प्रश्नाला दिलेल्या उत्तरातून समोर आलेले आहे. मंत्री पंकज चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2020 मध्ये गोव्यात सोने तस्करीच्या सात घटना उघडकीस आल्या. त्यात 7.74 कि.ग्रॅ. सोने जप्त करण्यात आले.
2021 मध्ये 13 घटना घडल्या, त्यात 12.22 किलो सोने जप्त केले गेले. 2022 मध्ये घटना घडल्या, त्यात 8.90 किलो सोने जप्त केले. तर, चालूवर्षी आतापर्यंत एक घटना उघडकीस आली असून त्यात 1.91 किलो सोने जप्त करण्यात आले आहे.

तस्करी प्रकरणाला आमचा सदैव विरोध राहिला आहे. आशा प्रकारची प्रकरणे एखाद्या सोन्याच्या व्यापार्‍यांना आढळून आल्यास आम्ही त्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहे. तस्करीचे प्रमाण गोव्यात वाढत असल्यास सरकारने व पोलिसांनी कडक कारवाई करण्यासाठी मोठया संख्येने कारवाई पथक तैनात करावे.
– प्रमित रायकर, सोने विक्रेता संघटनेचे अध्यक्ष.

विविध देशांत तस्करीचे जाळे

अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या होणारी तस्करी पाहिल्यास मोठी टोळी सक्रिय असून, तस्करीचे जाळे विविध देशांत पसरले आहे. पूर्वी सोन्याची बिस्किटे किंवा पावडर या माध्यमातून सोन्याची तस्करी होत होती. आता मात्र सोन्याची पेस्ट करून तस्करी केली जात असल्याचे वरील प्रकरणातून उघडकीस आले आहे.

39 विमानतळांवर तस्करी वाढली

देशांतर्गत अहवालानुसार, 39 विमानतळांवर सोन्याची तस्करी वाढली आहे. मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, बंगळुरूसह देशातील एकूण 39 विमानतळांवर सोन्याची तस्करी वाढल्याचे दिसून आले आहे. 2023 च्या वर्षात आतापर्यंत या 39 विमानतळांवरून तब्बल 2531 किलो सोने तपास अधिकार्‍यांनी जप्त केले आहे. तर अन्य ठिकाणांहून एकूण 1459 किलो सोन्याची जप्ती करण्यात आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news