पणजी; विठ्ठल गावडे पारवाडकर : पुढील वर्षी होणार्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने उत्तर आणि दक्षिण गोवा मतदारसंघ काबीज करण्यासाठी जोरदार कंबर कसली आहे. सध्या तरी भाजपचे पारडे जड दिसत आहे. विरोधकांकडे प्रबळ उमेदवार दिसत नसल्याने भाजपला कोण टक्कर देणार, याविषयीचे चित्र स्पष्ट होत नाही.
केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. सरकारच्या स्वयंपूर्ण गोवा, प्रशासन आपल्या दारी यासोबतच भाजपतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याची प्रशंसा करणारे राष्ट्रपतींचे भाषण घरोघरी पोहोचवणे, घर चलो अभियान, बूथ सशक्तीकरण अभियान, आदी उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत भाजपचे कार्यकर्ते व नेते पोहोचत आहेत. त्यामुळे राज्यात भाजपला अनुकूल वातावरण आहे. दुसरीकडे भाजपला टक्कर देण्याची क्षमता असलेला विरोधी पक्ष काँग्रेसकडे सध्याच्या घडीला उमेदवारच दिसत नाहीत. राज्यात त्यांच्याकडे अवघे 3 आमदार असल्याने लोकसभेसाठी हवे असलेले मतदारांचे बळ ते कसे उभे करतात ते पाहावे लागेल. दक्षिणेचे काँग्रेसचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांना यावेळी उमेदवारी मिळण्याची शक्यता धुसर आहे. इतर पक्ष आपले उमेदवार उभे करणार असले तरी त्यांच्यात जिंकण्याची क्षमता नाही हे सर्वांना माहीत आहे.
राज्यातील 40 आमदारांपैकी तब्बल 33 आमदारांचा पाठिंबा भाजपच्या राज्य सरकारला आहे. त्यामुळे या 33 आमदारांचे बळ भाजपच्या उमेदवारांना मिळणार आहे. या 33 मध्ये 28 आमदार भाजपचे स्वत:चे असून मगो पक्षाच्या दोन व तीन अपक्ष आमदारांचा भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा मिळणार आहे. त्यामुळे पहिल्यांदाच 33 आमदारांच्या पाठिंब्यासह भाजप लोकसभा निवडणूक लढवणार असून भाजपचे पारडे जड दिसत आहे.
भाजपकडे लोकसभा निवडणुकीसाठी अनेक बलवान इच्छुक उमेदवार तयार आहेत. विद्यमान खासदार व केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक सहाव्यांदा लोकसभेत जाण्यास तयार आहेत. त्यांच्यासोबतच भाजपचे प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, माजी मंत्री जयेश साळगावकर, माजी आमदार दयानंद सोपटे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. उत्तरेतील वातावरण पाहता उमेदवार कुणीही असला तरी तो जिंकण्याची शक्यता आहे. केंद्रीय भाजपच्या नेत्यांनी युवा नेतृत्वाला संधी देण्याचे धोरण जाहीर केले असल्याने श्रीपाद नाईक यांच्या जागी नवा उमेदवार देण्यावर भाजप विचार करत असला तरी श्रीपाद नाईक हे भाजपचे सर्वांत ज्येष्ठ नेते असल्याने त्यांना शेवटची संधी भाजप देऊ शकते.
गोव्यात अनेक पक्ष आहेत, मात्र भाजप, काँग्रेस वगळता इतर पक्षांना लोकसभेसाठी संधी दिसत नाही. दक्षिणेत दोन आमदार असलेल्या आम आदमी पक्षाकडे उत्तरेत उमेदवार दिसत नाहीत. वाल्मिकी नाईक यांच्या नावाचा ते विचार करू शकतात. दोन आमदार असलेला मगो पक्ष सरकारमध्ये असल्याने लोकसभेसाठी तो पक्ष उमेदवार उभे करण्याची शक्यता नाही. गोवा फॉरवर्ड पक्ष तर लोकसभेचा विचारच करणार नाही, असे तूर्त तरी दिसते. फातोर्डा वगळता कुठेच आमदार नाही आणि अलीकडच्या काळात काँग्रेसशी जवळीक वाढल्याने सरदेसाई विधानसभेवरच लक्ष केंद्रित करतील.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ऐनवेळी उमेदवार उभे करू शकतो. शिवसेना महाराष्ट्रात फुटली आहे. शिवसेनेचे फारसे काम येथे नसल्याने तो पक्षही लोकसभेचा विचार करणार नाही, असेच चित्र आहे. मात्र, पहिल्याच निवडणुकीत 75 मतांनी का असेना एक आमदार निवडून आणलेला रिव्होल्युशनरी गोवन्स पक्ष मात्र लोकसभेसाठी उमेदवार उभे करून आपल्या मागे जनमत किती आहे हे आजमावण्याची शक्यता आहे. आरजीचे प्रमुख मनोज परब हे त्यांचे उमेदवार असू शकतात.