

पणजी : पुढारी वृत्तसेवा : विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून (दि.27) सुरू होणार आहे. अधिवेशन कामकाज 28,29 आणि 31 मार्च रोजी चालणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बुधवारी (दि. 29) अर्थसंकल्प सादर करतील. अधिवेशनात विरोधी पक्ष सरकारला खंडणीचा मुद्दा, वनक्षेत्रातील आग, म्हादईचे पाणी वळविणे आणि बेरोजगारी या मुद्द्यांवर घेरण्याचा प्रयत्न करणार आहेत.
यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पाच दिवसांचे होणार होते. मात्र, 30 रोजी रामनवमी असल्याने त्या दिवशी कामकाज होणार नाही. अर्थसंकल्पावर चर्चा करण्यास पुरेसा वेळ मिळत नसल्याने विरोधी पक्षांनी पुढील अधिवेशनात चर्चा करण्याची मागणी केली होती. ती मान्य झाल्याने लेखानुदान मंजूर करून चर्चा मान्सून अधिवेशनात होणार आहे. याबाबत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले की, या अधिवेशनात भाजप सरकारच्या आत्मस्तुतीपर कार्यक्रमांवर आणि जाहिरातींवर खर्च झालेल्या कोट्यवधी रुपयांची आकडेवारी समोर येणार आहे. आम्ही अमली पदार्थांचा व्यापार, वेश्याव्यवसाय, डान्सबार, खंडणीचा मुद्दा, पर्यटन क्षेत्रातील दलाल आणि इतर मुद्द्यांवरून सरकारला उघडे पाडणार आहोत.
गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष, आमदार विजय सरदेसाई म्हणाले की, राज्य सरकारसाठी अर्थसंकल्प म्हणजे जणू एक इव्हेंट झाला आहे. याद्वारे मुख्यमंत्र्यांना स्वतःची जाहिरात करायची आहे. आम्ही बेरोजगारी, खाण व्यवसाय, किनारी भागातील खंडणी प्रकरण, कर्नाटकला दिलेला डीपीआर, अवैध ऑनलाईन कॅसिनो तसेच राज्याच्या एकूण आर्थिक स्थितीवर प्रश्न उपस्थित करणार आहोत.