‘असा’ साजरा होतो गोव्यात नवरात्रौत्सव! | पुढारी

‘असा’ साजरा होतो गोव्यात नवरात्रौत्सव!

पणजी : पुढारी वृत्तसेवा

आजपासून नवरात्रौत्सवाला प्रारंभ झाला आहे. विविध राज्यांमध्ये या उत्सवाचे स्वरूप वेगळे असल्याचे पाहायला मिळते. पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजा, गुजरातमध्ये नवरात्री तर महाराष्ट्रात नवरात्रौत्सव म्हणून हा उत्सव साजरा केला जातो. गोव्यातही हा उत्सव साजरा केला जातो. गोव्यात गणेशचतुर्थी हा जरी मुख्य उत्सव म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येत असला तरी नवरात्रोत्सवही मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. विशेषतः गोव्यातील ग्रामीण भागात या उत्सवांचे विशेष आकर्षण असते.

येथील काही घरांमध्ये घटस्थापना केली जाते. मंदिरामध्ये मखर सजवून नऊ दिवस देवीचा जागर केला जातो. मखर म्हणजे एक प्रकारचा झोपाळा असतो ज्यामध्ये देवीची मूर्ती ठेवली जाते. त्यावर कागदाची कलाकुसर केली जाते. आणि या नऊ दिवसात रोज रात्री देवळात कीर्तन, भजन यासह सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री उशिरा मखराची आरती केली जाते. मखर मागे- पुढे असे विविध पद्धतीने हलविले जाते. शेवटच्या दिवशी देवीची पालखी गावाच्या वेशीपर्यंत काढली जाते, तिथे आपट्याची पाने तोडून, पूजा करून पुन्हा पालखी मंदिरात आणली जाते.

विविध मंदिरात पूजा बांधण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. काही मंदिरात दररोज विविध अवतारात पूजा बांधली जाते. तर काही मंदिरात एकापेक्षा अधिक मूर्ती बसविल्या जातात. नागेशी, शांतादुर्गा, मंगेशी, महालसा या देवळांमध्ये पहिल्या दिवशी ३ मूर्तींची तर दुसऱ्या दिवशी ५ मूर्तींची पूजा बांधली जाते.

नवरात्रौत्सवाच्या काळात गोव्यात नौकारोहण केले जाते

येथे बहुतांश मंदिरांसमोर तलाव आहेत. वर्षातून एकदा मंदिरातील देवाला तलावातून फिरवून आणले जाते. याप्रसंगी होडीवर स्टेज करून ते सजविले जाते. यावर मूर्तीला बसवून तिला तलावातून फिरवून आणले जाते. रात्री जागर केला जातो. वेलिंगचे नृसिंह देवस्थान, मंगेशी, मार्दोळ, नागेशी, शांतादुर्गा या मंदिरात नौकारोहण केले जाते.

विविध भागातून मूर्ती विटाळू नयेत म्हणून आणल्या आंत्रुज महालमध्ये…

फोंडा परिसरात असणाऱ्या आंत्रुज महाल येथे सध्या असणाऱ्या मूर्ती या गोव्याच्या विविध भागातून आणल्या आहेत. साधारण ५००-५५० वर्षांपूर्वी बाटाबाटीच्यावेळी या मूर्ती तेथील स्थानिकांनी या देवभूमीत आणल्या होत्या. यामध्ये मंगेशी ही मूळची कुठ्ठाळी, वेलिंग येथील नृसिंह ही मूर्ती सांकवाळ येथील तर वेरणा येथील महालसाची मूर्ती साळसेट परिसरातील आहे.

दरवर्षी गोव्यात होणारे मखर, नौकरोहण, सीमोल्लंघन हे डोळ्याचे पारणे फेडणारे असतात. पण मागच्या वर्षीपासून कोविड परिस्थितीमुळे हे सर्व बंद करण्यात आले आहे. काही मंदिरात मखरही केले नव्हते. यावर्षीही काही अंशी तशीच परिस्थिती दिसून येते आहे. अन्यथा गोव्यातील नवरात्रोत्सव म्हणजे विशेष पर्वणी असते.

विजयकुमार कामत, वेलिंग, फोंडा, गोवा

Back to top button