गोव्याची ‘फेणी’ आता राज्याबाहेरही मिळणार | पुढारी

गोव्याची 'फेणी' आता राज्याबाहेरही मिळणार

पणजी; पुढारी वृत्तसेवा :  गोवा राज्याची ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारे वारसापेय म्हणून मान्यता मिळालेले ‘फेणी’ राज्याबाहेरही विक्रीसाठी उपलब्ध व्हावे, यासाठी राज्य सरकारच्या अबकारी आणि उत्पादन शुल्क खात्याने प्रयत्न सुरू केले आहेत. देशाच्या विविध राज्यांमध्ये फेणी हे पेय विक्रीसाठी उपलब्ध व्हावे, यासाठी अबकारी खात्याने इतर राज्यांच्या प्रशासकीय खात्यांना पत्रे पाठविण्यास सुरूवात केली. याशिवाय सर्व शुल्क- मुक्त दुकानांवर हे पेय उपलब्ध होण्यासाठी खाते प्रयत्न करणार असून तसे झाल्यास देशी आणि विदेशी पर्यटकांना फेणी कुठेही विकत घेता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर त्याची लोकप्रियता वाढण्याची शक्यता गोवा वन विकास महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. दिव्या राणे यांनी नुकतीच व्यक्त केली.

दक्षिण अमेरिकेतील अनेक देशांमध्ये व्यावसायिक स्तरावर काजू उत्पादन करण्याची परंपरा असली तरीही फेणी तयार करण्याची प्रक्रिया त्यांना माहीत नसल्याने ती प्रक्रीया शिकण्यासाठी असे उत्पादक गोव्यात येऊ शकतात गोवा राज्यालाही याचा बराच लाभ होऊ शकतो. याशिवाय काजू उत्पादन वाढविण्यासाठीही सरकारकडून विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.

काजू उत्पादनात गोवा शेवटच्या स्थानावर

राष्ट्रीय स्तरावर काजू उत्पादनाचे प्रमाण दर हेक्टरमागे ७६० किलोग्रॅम एवढे आहे. पण गोव्यात हेच प्रमाण ४५४ किलो एवढे आहे. काजू उत्पादनात देशात गोवा राज्य हे ७ व्या आणि सर्वात शेवटच्या स्थानावर आहे. त्यामुळे काजू उत्पादन वाढावे यासाठी वन विकास महामंडळातर्फे यापुढे प्रयत्न केले जाणार आहेत. काजू उत्पादन करणाऱ्या राज्यांमध्ये आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, ओरीसा, तामिळनाडू आणि गोवा राज्याचा समावेश आहे.

Back to top button