गोवा : मुलांना शाळेत सोडण्यास गेलेल्या पित्याचा अपघाती मृत्यू

म्हापसा : पुढारी वृत्तसेवा : नागवा, बार्देश येथे झालेल्या अपघातात शाळेत मुलांना पोचवण्यासाठी निघालेल्या वडिलांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन्ही जखमी मुलांवर उपचार सुरू आहेत. हा अपघात शुक्रवारी सकाळी 7.45 वाजता घडला.
रावतावाडो, नागवा येथे राहणारे जॉन त्रिनीदाद डिसोजा (57) हे नेहमी प्रमाणे आपल्या दोन मुलांना घेऊन जीए- 03 एए- 8091 या दुचाकीने हडफडे येथील सेंट जोसेफ हायस्कूलमध्ये घेऊन जात होते. होली ट्रिनिटी चर्चजवळ पाठीमागून भरधाव येणार्या जीए – 03 टब्ल्यू 7817 कारने जोरदार धडक दिली. यामुळे जॉन व दोन्ही मुले रस्त्यावर फेकले गेले. अपघातानंतर जॉन डिसोजा यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले असताना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. गंभीर जखमी झालेल्या दोन्ही मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हणजूण पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करून आय टेन कारचा चालक पोषक जतीनकुमार शहा (रा. वडोदरा, गुजरात) याच्याविरोधात गुन्हा नोंद केला असून त्याला अटक केली आहे.