गोवा : जनतेची कामे रखडल्यास कारवाई; मंत्रिमंडळाचा अधिकार्‍यांना इशारा | पुढारी

गोवा : जनतेची कामे रखडल्यास कारवाई; मंत्रिमंडळाचा अधिकार्‍यांना इशारा

पणजी; पुढारी वृत्तसेवा : जनतेचे प्रश्न, समस्या ऐकण्यासाठी संपूर्ण मंत्रिमंडळाने ‘प्रशासन आपल्या दारी‘ उपक्रम राबविला. जनतेची कामे मार्गी लावण्यात अधिकारीच कुचराई करीत असल्याचे यावेळी मंत्र्यांच्या निदर्शनास झाले. त्यामुळे जनतेसमोरच अधिकार्‍यांना खडेबोल सुनावत कारवाईचा सूचक इशारा देण्यात आला.

राज्यातील सरकारी जमिनी हडप करण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यातील दोषींवर कारवाई होईलच. सरकारी अधिकारी सतर्क राहिल्यास जमीन हडप करण्याचे प्रकार घडणारच नाहीत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केपेत केले.

इन्स्टिट्यूट ऑफ मिनेझिस ब्रागांझा सभागृहामध्ये कृषिमंत्री रवी नाईक यांनी तिसवाडी तालुक्यातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. तालुक्यातील शेतीविषयक समस्या मांडून त्यावर मार्ग काढण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. सांगे येथे वनमंत्री विश्वजित राणे यांनी वन अधिकार्‍यांना खडेबोल सुनावले. राखीव वन्य क्षेत्रात राहणार्‍या आदिवासींना सरकारकडून मूलभूत सुविधा मिळवून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. चार वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या भूमिगत वाहिनीचे काम अडकून पडले आहे. गटार बांधणीलाही अधिकार्‍यांकडून हरकत घेतली जाते, हे चुकीचे आहे. मी असतो तर तुम्हाला दहा दिवस सुट्टीवर पाठवून कामे पूर्ण करून घेतली असती, अशा शब्दांत राणे यांनी अधिकार्‍यांची कानउघाडणी केली. जे सरकारी अधिकारी कामात निष्काळजीपणा करतील त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी बायणा येथे दिला.

म्हापसा येथे गृह आधार योजना, लाडली लक्ष्मी योजना, विधवा पेन्शन योजनांचे पैसे लाभार्थ्यांना वेळेवर मिळत नाहीत, अशी तक्रार वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्यासमोर करण्यात आली. याच वेळी एका महिलेने आपण बेकायदा घरात राहत असून कायदेशीर घर क्रमांक कधी मिळणार, असा थेट सवाल केला.

धारबांदोडा येथील पिण्याच्या पाण्याची समस्या, कमी दाबाचा वीज पुरवठा, खड्डेमय रस्ते, जमिनीचे हक्क, वन हक्क कायदा, प्रशासन या संदर्भात समस्या सरपंच, पंच व नागरिकांनी पशुसंवर्धन मंत्री नीळकंठ हळर्णकर व आमदार गणेश गावकर यांच्यासमोर मांडल्या. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन मंत्री हर्ळणकर यांनी दिले.

प्रत्येक पंचायतीत तसेच पालिका क्षेत्रात कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारणीवर भर देण्यात येत आहे. त्यासाठी लवकरच कार्यवाही करण्यात येईल, असे महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी फोंडा येथे सांगितले.

 

Back to top button