गोवा : तीन दिवस धुमसत असलेली साट्रे डोंगरावरील आग काही प्रमाणात आटोक्यात | पुढारी

गोवा : तीन दिवस धुमसत असलेली साट्रे डोंगरावरील आग काही प्रमाणात आटोक्यात

वाळपई; पुढारी वृत्तसेवा :  तीन दिवस धुमसत असलेली साट्रे दीपाजी राणे गड डोंगरावरील आग काही प्रमाणात आटोक्यात आलेली आहे. तरीसुद्धा आग आटोक्यात आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहेत. यामध्ये वनखात्याची यंत्रणा मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेली आहे. अधिकार्‍यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रात्री उशिरापर्यंत आग पूर्णपणे आटोक्यात येण्याची शक्यता आहे. मात्र, पारवड कर्नाटकच्या बाजूने आगीचा लोळ येथे असल्यामुळे पुन्हा एकदा या डोंगरावर आगीचा भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, वनमंत्री विश्वजित राणे यांनी रात्री उशिरा या ठिकाणी भेट देऊन माहिती घेतली. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अतिरिक्त प्रधान वनसंरक्षक सौरभ कुमार यांना सूचना दिल्या आहेत. याकामात गरज पडल्यास जिल्हाधिकारी तसेच नौदलाची मदत घेणार आहोत. घटनेचा अहवाल लवकरच मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला देण्यात येणार आहे, असे राणे यांनी सांगितले.

अभयारण्याच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, साट्रे डोंगरावरील आग जवळपास 90 टक्के आटोक्यात आलेली आहे. आगीवर नियंत्रण राखण्यात कर्मचारी यशस्वी ठरलेले आहेत. वनाखात्याचे कर्मचारी पथक या भागांमध्ये तैनात करण्यात आलेले आहे. रात्री उशिरापासून हे पथक या ठिकाणी काम करणार असून कर्नाटक पारवड भागातून आगीचा वणवा गोव्यामध्ये येऊ नये या संदर्भाचे पूर्णपणे खबरदारी घेण्यात येणार असल्याचे अधिकार्‍यांनी स्पष्ट केलेले आहे.

दरम्यान, सोमवारी सकाळी सत्तरी उपजिल्हाधिकारी प्रवीण परब, मामलेदार दशरथ गावस, अग्निशामक दलाचे अधिकारी यांनी संयुक्तरत्या साट्रे गावामध्ये भेट देऊन पाहणी केली व या संदर्भाचा आढावा घेतला. हा अहवाल जिल्हाधिकार्‍यांना सादर करण्यात आलेला आहे. जिल्हाधिकार्‍यांनी ही बाब अत्यंत गंभीरपणे घेतली असून त्यांनीही संध्याकाळी उशिरा गावांमध्ये प्रत्यक्षपणे भेट देऊन एकूण परिस्थितीची पाहणी केली. आग पूर्णपणे आटोक्यात यावी, या संदर्भाचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी वनखात्याच्या यंत्रणेला दिलेले आहेत.

आगीचे कारण अस्पष्ट

ग्रामस्थांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या डोंगरावर अचानकपणे आग लागण्याचे कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र ग्रामस्थांच्या माहितीनुसार, कुणीतरी आग लावल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात काजू बागायतींची त्याचप्रमाणे जंगल संपत्तीची हानी झाल्याचे यावेळी ग्रामस्थांनी सांगितले.

जंगली प्राणी दगावल्याची शक्यता

सत्तरी तालुक्याचा परिसर हा पश्चिम घाटाचा समृद्ध इतिहास सांगणारा परिसर आहे. यामध्ये अनेक वनौषधी व दुर्मीळ जंगली झाडांचा समावेश आहे. या आगीतून साट्रे डोंगरावरील अनेक दुर्मीळ झाडांचा खजिना आहे. या आगीत वनौषधी, जंगली झाडे नष्ट झाली आहेत. जवळपास दहा किलोमीटर परिसर आगीमध्ये भस्मसात झाला आहे. या भागामध्ये पट्टेरी वाघ, रानडुक्कर, चितळ, हरण, रानडुक्कर, गवे, अस्वल, दुर्मीळ पक्षी यांचा मोठ्याप्रमाणात वावर होता. आगीमुळे अनेक प्राणी दगावल्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली. या भागांमध्ये हे मोठ्या प्रमाणावर घडत आहे.

Back to top button