गोवा : पेडणे येथील शिमगोत्सवाला सुरुवात | पुढारी

गोवा : पेडणे येथील शिमगोत्सवाला सुरुवात

पेडणे; पुढारी वृत्तसेवा :  पेडणे येथील श्री देवी भगवती रवळनाथ देवस्थान समितीचा वार्षिक शिमगोत्सव 6 रोजी रात्री श्री भगवती श्री रवळनाथ श्री माऊली व श्री मुळवीर मंदिरासमोर पोफळीच्या होळी घालून प्रारंभ करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. आदल्या रात्री हळदीचे पाणी नागरिकांना लावून सामुदायिक शिमगोत्सवाचे गार्‍हाणे घातले जाते. त्यानंतर श्री रवळनाथ, श्री भगवती माऊली व रात्री 12 वाजता मूळवीर देवाची होळी घालण्यात आली.

या होळी एक वर्ष मालपे, दुसर्‍या वर्षी पणशीकर वाडा व तिसर्‍या वर्षी पराष्ट्रेतून जे देशप्रभू यांच्या जमिनी कुळांच्या बागायती आहे. त्यातील पोफळीची होळी आणली जाते. ती साळगावकर कुटुंबीयांनी कापावी लागते. नंतर भगवती मंदिराकडे होळीचा खड्डा हा गडेकर कुटुंबीयांतर्फे खोदण्यात येतो. नंतर नागरिकांमार्फत होळी घातली जाते, अशी माहिती देवस्थान समितीचे पदाधिकारी जगन्नाथ देसाई यांनी दिली.

होळीची सजावट गडेकर करतात. दुसर्‍या दिवसांपासून रोंबाट सुरू होते. तिसर्‍या दिवशी पराष्टे व नयबाग मूळवीर देवाला भेटायला जातात. नंतर इतर खाजणे, अमेरे, सरमळे, मालपे वाड्यावरील रोमटे मूळवीर भेटीला जातात.
सातव्या दिवशी रंगपंचमी होते. गुलाल उधळून सती या देवीकडे शिमगोत्सवाची सांगता करणारे सामुदायिक गार्‍हाणे घातले जाते. वाजत गाजत नागरिकांनी मुख्य होळी भगवती मंदिराच्या प्रांगणात घातली.

Back to top button