गोवा : फुटबॉल सामन्यांच्या फिक्सिंगची चौकशी | पुढारी

गोवा : फुटबॉल सामन्यांच्या फिक्सिंगची चौकशी

पणजी; पुढारी वृत्तसेवा : गोव्याचा लोकप्रिय खेळ असलेल्या फुटबॉल खेळातही आता फिक्सिंग होऊ लागले आहे. गोवा फुटबॉल संघटने (जीएफए) च्या तक्रारीनंतर गोवा पोलिसांच्या क्राईम ब्रँचने गार्डियन एंजल एससी आणि वेळसांव स्पोर्टस् अँड कल्चरल क्लब या दोन क्लबमधील खेळाडू आणि अधिकार्‍यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. या प्रकारामुळे गोव्याचे फुटबॉल क्षेत्रच कलंकित होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

संशयित दोन्ही क्लबच्या अध्यक्षांसह प्रशिक्षक, व्यवस्थापक आणि कर्णधार यांना पहिल्या टप्प्यात चौकशीसाठी पोलिसांनी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. दरम्यान, गोवा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष कायतान फर्नांडिस यांनी याबाबत खंत व्यक्त करून गोवा पोलिस या प्रकरणाच्या मुळापर्यंत जातील आणि सत्य शोधून काढतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. फुटबॉल सामन्यात फिक्सिंग करणे फार धोक्याचे असून त्यामुळे गोव्याचा फुटबॉल क्रीडाप्रकार काळंवडेल आणि देशभरात नाचक्की होईल, असेही ते म्हणाले.

आपण या विषयावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली आणि सखोल चौकशीची विनंती त्यांना केल्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षकांनी तपास सुरू केला आहे. आमच्याकडे असलेली सर्व कागदपत्रे आणि पुरावे आम्ही तपास अधिकार्‍यांकडे सुपूर्द केले आहेत. सट्टेबाजी कशी चालते त्याची माहिती पोलिसांना आहे. 2019-20 च्या हंगामापासून, गोवा प्रो लीगमधील अनेक सामने आंतरराष्ट्रीय बेटिंग मॉनिटर्सने मॅच-फिक्सिंग दर्शविणार्‍या संशयास्पद बेटिंग पॅटर्नसाठी लाल ध्वजांकित केले आहेत. लाल ध्वजांकित केले जाणारे नवीन सामने यावर्षी जानेवारी महिन्यात खेळले गेले.

गोवा फुटबॉल संघटनेसोबत दीर्घकालीन करार आहे त्या लंडनस्थित जीनियस स्पोर्ट्सने सादर केलेल्या गोपनीय अहवालानुसार 4 जानेवारी आणि 11 जानेवारी दरम्यान खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांमध्ये संशयास्पद सट्टेबाजीचे प्रकार समोर आले आहेत. कमकुवत संघ मजबूत संघाविरुध्द सहज जिंकतो तेव्हा बेटिंग तथा फिक्सिंगचा संशय बळावतो. वरील दोन्ही संघाविरोधातील सट्टेबाजीचे नमुने मिळाले आहेत, असेही फर्नांडिस यांनी सांगितले.

Back to top button