गोवा : जीवाचा गोवा करण्यासाठी गुजरातमध्ये व्यापार्याला लुटले

म्हापसा; पुढारी वृत्तसेवा : गुजरातमधील व्यावसायिकाला गोळ्या घालून गंभीर जखमी करून त्याच्याकडील 40 लाख लुटून जीवाचा गोवा करण्यासाठी आलेल्या तिघांना अटक करण्यात आली. कळंगुट आणि गुजरात पोलिसांच्या पथकाने ही कामगिरी केली.
रविवारी 29 जानेवारी रोजी अपना नगर, गांधीधाम, गुजरात येथील एका व्यावसायिकास संशयितांनी गोळ्या घातल्या. यात ते व्यावसायिक गंभीर जखमी झाले. त्यांच्याकडील 40 लाख रुपये लुटून पोबारा केला. गांधीधाम, गुजरात पोलिसांनी याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा नोंद केला. तिघेही संशयित शुक्रवारी 3 रोजी गोव्यात आल्याची माहिती गुजरात पोलिसांना मिळाली. तसेच ते सर्वजण कळंगुट येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी गोवा पोलिसांची संपर्क साधला.
या घटनेची व संशयित कळंगुट येथे असल्याची माहिती शनिवारी पोलिसांना मिळाल्यानंतर कळंगुट पोलिस निरीक्षक दत्तगुरू सावंत यांनी उपनिरीक्षक राजाराम बागकर, हवालदार विद्यानंद आमोणकर, कॉन्स्टेबल मनोज नाईक, गौरव चोडणकर, अमीर गरड, योगेश खोलकर यांच्यासोबत तपास कार्य सुरू केले. यात संशयितांपैकी मनुसिंग ठाकूर हा कांदोळी येथील फुटबॉल मैदानाजवळ सापडला. त्याला ताब्यात घेतल्यानंतर बाकीचे दोघे पणजी येथे असल्याचे समजले. त्यानुसार गोव्यात आलेले गुजरात, कच्छ (पु) गुन्हे अन्वेषणचे उपनिरीक्षक एस. एस. वारू व त्यांच्या साथीदारसह पोलिसांनी पणजी गाठली व कॅसिनोमध्ये असलेल्या छत्रपाल सिंग व सुरत सिंग यांना ताब्यात घेतले. गुजरात पोलिसांनी तिघांनाही अटक करून, गुजरातला नेल्याची माहिती निरीक्षक दत्तगुरू सावंत यांनी दिली.