Bombay High Court : शिक्षकाने विद्यार्थ्याला दिलेली शिक्षा गुन्हा नाही

पणजी : शिक्षकाने शिस्त लावण्यासाठी विद्यार्थ्याला केलेली शाब्दिक किंवा चापटीची शिक्षा म्हणजे गुन्हा नव्हे. अशी कृती अत्यंत सामान्य आहे. विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी लावण्यासाठी शिक्षक किरकोळ स्वरूपाची शिक्षा करू शकतात, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिला आहे.
एका प्राथमिक शाळेच्या शिक्षिकेने 2014 मध्ये पाच आणि आठ वर्षांच्या दोन बहिणींना मारहाण केली होती. यापैकी पाच वर्षांची मुलगी तिच्या वॉटरबॅगमधील पाणी संपले म्हणून शेजारच्या विद्यार्थ्याच्या वॉटरबॅगमधील पाणी पीत होती. शिक्षिकेने ते पाहिले आणि तिने तिला छडीने हातावर मारून शिक्षा केली, असा शिक्षिकेवर आरोप होता. या ‘गुन्ह्या’बद्दल कनिष्ठ न्यायालयाने शिक्षिकेला एक दिवसाचा कारावास आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. त्यामुळे शिक्षिकेने उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायमूर्ती भरत देशपांडे यांच्या एकल खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.