गोवा : ‘म्हादई’ : जिंकू किंवा मरू; मडगावातील सभेत निर्धार | पुढारी

गोवा : ‘म्हादई’ : जिंकू किंवा मरू; मडगावातील सभेत निर्धार

मडगाव; पुढारी वृत्तसेवा : भाजप सरकारने गोवा राज्य कॉर्पोरेट जगताशी संबंधित असलेल्या बलाढ्य व्यापार्‍यांच्या हाती सोपावण्याचा घाट रचला आहे. कोळशाच्या माध्यमातून राज्याच्या पर्यावरणाची हानी करू पाहणार्‍या या व्यापार्‍यांनी आता ‘म्हादई’चे पाणी वळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यांच्या हातातून गोवा वाचविण्यासाठी ‘जिंकू किंवा मरू’, असा निर्धार येथे मंगळवारी झालेल्या सभेत करण्यात आला.

‘म्हादई’प्रश्नी 30 जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता मोठ्या संख्येने ‘एमपीटी’ समोर जमून निदर्शने केली जातील, असा निर्णयही सभेत घेण्यात आला. या जाहीर सभेस पर्यावरणवादी कार्यकर्ते उपस्थित होते. 26 जानेवारी रोजी सर्व ग्रामपंचायतींनी खास ग्राम सभा घेऊन ‘म्हादई’च्या समर्थनास ठराव घ्यावा, असे आवाहन या सभेत करण्यात आले. यावेळी पर्यावरणवादी डायना तावारीस, झेव्हीयर फर्नांडिस, शशिकांत सावर्डेकर आदी उपस्थित होते.

26 जानेवारी रोजी सेव्ह ‘म्हादई’ यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात सर्व समाज कार्यकर्ते सहभागी होणार आहेत, अशी माहिती अभिजित प्रभुदेसाई यांनी दिली. या सभेच्या माध्यमातून म्हादई, कोळसा तसेच सरकारचे मोठमोठ्या कंपन्यांशी असलेल्या संबंधांबद्दल गावागावांत फिरून जनजागृती करण्याचा ठराव करण्यात आला. ही जनजागृती करण्यासाठी यावेळी एक पथक निवडले आहे.

Back to top button