गोवा : ... तर फुकटात भाजपप्रवेश : विजय सरदेसाई यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन | पुढारी

गोवा : ... तर फुकटात भाजपप्रवेश : विजय सरदेसाई यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

मडगाव : पुढारी वृत्तसेवा : पन्नास खोके स्वीकारून गोव्यातील आमदारांनी भाजप प्रवेश केला आहे. मी फुकटात भाजपमध्ये प्रवेश करण्यास तयार आहे. पण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकात जाऊन प्रचार करताना कोणत्याही परिस्थितीत आपण म्हादईचे पाणी वळवू देणार नाही, असा इशारा कर्नाटकाला द्यावा, असे आवाहन आमदार विजय सरदेसाई यांनी केले. ते एका कार्यक्रमांत पत्रकारांशी बोलत होते.

कर्नाटकात होणार्‍या निवडणुकीच्या प्रचारात भाजपलाच मतदान करा. मात्र, गोवा सरकार म्हादईचे पाणी कर्नाटकात वळवणार नाही असे वक्तव्य करण्याचे धाडस मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दाखवावे. त्यांनी असे केल्यास आपण फुकटात भाजपमध्ये प्रवेश करेन, असे सरदेसाई म्हणाले. म्हादईचा विषय अनेक वेळा राज्यात पेटला आहे. मात्र ज्या वेळी म्हादईसाठी विरोधक रस्त्यावर उतरले त्या त्या वेळी सरकारने त्यात खो घातला.

पन्नाास खोके, ऑल ओके

सरकारने समिती स्थापन करण्याचे नियोजन आखून वेळ वाया घालवू नये. समिती स्थापन करून त्यात होणारी चर्चा काहीही अर्थाची असत नाही. अशा अनेक समित्या आजपर्यंत तयार केल्या व त्यांचा शेवटी काहीही उपयोग झालेला नाही असेही चित्र आपण पाहिले आहे असे सरदेसाईंनी सांगितले. हिंमत असल्यास आपण दिलेले आव्हान मुख्यमंत्र्यांनी स्वीकारावे. ज्या आमदारांना 50 खोके देऊन भाजपमध्ये घेतले आहे पन्नास खोके, ऑल इज ओके अशी परिस्थिती झाली आहे.

Back to top button