गोव्याकडे येणार्‍या पर्यटकांना रोखण्याचा प्रयत्न : रोहन खंवटे | पुढारी

गोव्याकडे येणार्‍या पर्यटकांना रोखण्याचा प्रयत्न : रोहन खंवटे

पणजी / वास्को; पुढारी वृत्तसेवा : गोव्याकडे येणार्‍या विमानात बाँब असल्याचा बोगस मेल करणे, हा गोव्याकडे येणार्‍या पर्यटकांच्या मनात भीती निर्माण करून त्यांना रोखण्याचा प्रयत्नाचा एक भाग आहे. हे प्रयत्न नेमके कोण व का करते त्याचा शोध घोण्याची गरज आहे, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी शनिवारी सांगितले.

मॉस्कोहून गोव्याकडे येणार्‍या अझुर एअर चार्टर विमानामध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचा संदेश मेलद्वारे मिळाल्याने सदर विमान भारतीय हवाई हद्दीत प्रवेश करण्यापूर्वीच उझबेकिस्तानला वळविण्यात आले. या विमानामध्ये 240 प्रवासी व 9 कर्मचारी होते. गेल्या अकरा दिवसांतील ही दुसरी घटना आहे.

यापूर्वी 9 जानेवारीला अझुर हवाई कंपनीचे विमान दाबोळी विमानतळावर उतरण्यापूर्वीच बाँब ठेवल्याचा संदेश मिळाल्याने विमान तातडीने जामनगर- गुजरात धावपट्टीवर उतरविले होते. रशियन एअरलाईनचे अझुल एअर हे चार्टर विमान मॉस्कोहून 20 रोजी सुटल्यावर 21 रोजी पहाटे सव्वाचारला दाबोळी विमानतळावर उतरणार होते. परंतू 21 रोजी रात्री साडेबाराच्या दरम्यान दाबोळी विमानतळ संचालकाला एक ई मेल मिळाला. त्यात विमानामध्ये बॉम्ब ठेवल्याचे नमूद केले होते. त्यामुळे सदर विमान भारतीय हवाईहद्दीमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच ते उझबेकिस्तानला वळविले. तेथील धावपट्टीवर ते पहाटे साडेचारच्या दरम्यान उतरविले. 9 जानेवारीला विमानामध्ये बॉम्ब ठेवल्यासंबंधी अझुर कंपनीच्या कार्यालयामध्ये ई-मेल पाठविला होता तर 21 रोजी सदर ई मेल दाबोळी विमानतळ संचालक कार्यालयात पाठविण्यात आला.

9 जानेवारीस असे घडलेले

नऊ जानेवारीला जामनगरला उतरविलेल्या विमानाची तेथील बॉम्ब निकामी करणारे पथक, एनएसजी व गुजरात पोलिस आदी सुरक्षा यंत्रणामार्फत सुमारे सहा तास कसून तपासणी केली होती. परंतु विमानामध्ये काहीच मिळाले नव्हते. या विमानात कर्मचार्‍यांसह 244 जण होते. सदर विमान 10 रोजी जामनगरहून सुटल्यावर दुपारी दाबोळी विमानतळावर उतरले होते.

अफवा पसरवू नयेत : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, राज्याची गुप्तचर संघटना आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा असे विषय हाताळतात. पर्यटन केेंद्र असल्यामुळे समाजकंटक अशा अफवा पसरवतात, असे करू नये. समाजकंटक यंत्रणांना सतर्क राहण्याचा अनावश्यक असा इशारा देत असतात.

Back to top button