गोवा : विद्यार्थिनिशी असभ्य वर्तन; शाळेच्या कारकुनाला अटक | पुढारी

गोवा : विद्यार्थिनिशी असभ्य वर्तन; शाळेच्या कारकुनाला अटक

डिचोली; पुढारी वृत्तसेवा : डिचोली तालुक्यातील एका हायस्कूलच्या वरिष्ठ कारकुनाने त्याच हायस्कूलमधील एका अल्पवयीन विद्यार्थिनीची छळवणूक व विनयभंग केली. याप्रकरणी डिचोली पोलिसांनी या कारकुनावर गुन्हा नोंद करत त्याला अटकही केली आहे.

उपलब्ध माहितीनुसार हा प्रकार गेल्या डिसेंबर महिन्यात घडला होता. हायस्कूल असलेल्या गावातच राहणार्‍या विद्यार्थिनीशी तो उलटसुलट बोलत होता. हे प्रकरण ज्यावेळी पालकांना समजले, तेव्हा त्यांनी सदर कारकुनाच्या विरोधात त्याच हायस्कूलमधील वरिष्ठांकडे तक्रारी केल्या. विद्यार्थिनीच्या पालकांनी पालक-शिक्षक संघाकडे धाव घेऊन संपूर्ण प्रकार सांगितला. तसेच या हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनाही सदर प्रकार समजला. याविषयी गावात एक बैठकही झाली. त्यानुसार पोलिस तक्रार दाखल करण्याचे ठरले.

अखेर मंगळवारी (दि.10) पालक-शिक्षक संघानेच पोलिस स्थानकात कारकुनाविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सदर गुन्हा दाखल करून घेतला. मंगळवारी रात्रीच त्या कारकुनाला ताब्यात घेऊन अटक केली. त्याला डिचोलीतील प्रथम श्रेणी न्यायालयात सादर केले असता चार दिवसांच्या रिमांडवर घेण्यात आले. या प्रकरणी डिचोली पोलिस निरीक्षक सूरज गावस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल पोळेकर अधिक तपास करीत आहेत.

Back to top button