दाबोळी ते पणजीसाठी फोंड्यातून जावा : गुगल मॅपची शिफारस ; तक्रारीनंतर मार्गात बदल | पुढारी

दाबोळी ते पणजीसाठी फोंड्यातून जावा : गुगल मॅपची शिफारस ; तक्रारीनंतर मार्गात बदल

पणजी; पुढारी वृत्तसेवा : सध्या अनेक प्रवासी मार्ग शोधण्यासाठी गुगल मॅप या एपची मदत घेतात. मात्र, काहीवेळेस हे मॅप अद्ययावत न केल्याने प्रवाशांना लांब मार्गाने प्रवास करावा लागतो. दाबोळी विमानतळ ते पणजी या मार्गबाबतही असेच घडले. या मार्गावरून प्रवास करण्यासाठी गुगल मॅपने फोंड्याहून जाण्याची शिफारस केली होती.

मॅपने जुन्या किंवा नव्या झुआरी पुलाचा उल्लेखही केला नव्हता. त्यांनी दाबोळीहून पणजीला जाण्यासाठी बोरी पुलाचा वापर करून फोंड्यामार्गे जाण्याची शिफारस केली. त्यामुळे अनेक प्रवाशांना आणि पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागला. त्यांना 26 कि.मी.च्या प्रवासासाठी 61 कि.मी.चे अंतर कापावे लागले.

याबाबत अनेक प्रवाशांनी गोवा विमानतळ प्राधिकरणाकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर प्राधिकरणाने ट्विटरवर ही माहिती सामाईक केली. त्यांनी गुगल मॅपला टॅग करून मार्ग बदलण्याची विनंती केली. अखेर अवघ्या तासाभरात गुगल मॅपने मार्गात बदल केल्याचे सांगितले. नवीन मार्ग जुवारी पुलावरून दाखविला आहे.

Back to top button