गोवा : कासवांच्या मटणासाठी जीवघेणे धाडस ; दोघांच्या मृत्यूने प्रकार उघड | पुढारी

गोवा : कासवांच्या मटणासाठी जीवघेणे धाडस ; दोघांच्या मृत्यूने प्रकार उघड

सांगे; विशाल नाईक :  सुंदर नेत्रावळीतील कासवाची कोण अर्थात कासवांचे सर्वाधिक वास्तव्य असलेली गुहा (कपार) लोकांचे लक्ष वेधून घेऊ लागली आहे. नदीतील या गुफेत शेकडोंच्या संख्येने कासवांचे वास्तव्य आहे. कासवांच्या मटणासाठी अतुरलेले युवक जीव धोक्यात घालून येथे मृत्यूच्या प्रवेश करू लागले आहेत.

३१ डिसेंबर रोजी रात्री कासवाच्या मटणावर ताव मारण्याच्या हेतूने कासवाच्या कोंडीत उतरलेल्या सतीश गावकर आणि रामदास गावकर या नूने गावच्या दोन युवकांचा गुदमरून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर कासवाच्या कोंडीचा विषय ऐरणीवर आला आहे. नूने गावातील ही कासवाची कोंड सध्या बरीच चर्चेत आहे. कासवाची शिकार करणे कायद्याने गुन्हा आहे. कासव संवर्धन मोहिमेच्या माध्यमातून सरकार समुद्री कासवांची सुरक्षा करत आहे; पण राखीव वन क्षेत्रात मात्र याच कासवांचे मटण चवीने खाल्ले जात आहे. नूने गावातील नदीच्या किनाऱ्यावर ती गुहा आहे.  पाण्याने भरलेल्या या गुहेत प्रवेश करण्यासाठी बराच धोका पत्करावा लागत असल्याची माहिती स्थानिक पाईक गावकर यांनी दिली. गुहा आकाराने इतकी बारीक आहे की त्यात एकाच वेळी एक व्यक्ती तेही सरपटत आत सरकू शकतो. गुहेत शिरल्यानंतर पुन्हा वर चढावे लागते. तिथे नैसर्गिकरित्या निर्माण झालेल्या डोहात कासव असतात.

गावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार एकाच वेळी आठ ते दहा मोठे कासव पकडता येतात. कासव घेऊन परत येण्यासाठी तीच पद्धत पुनः वापरावी लागते. आत वळण्यासाठी जागा नसल्याने त्याच प्रकारे सरकत बाहेर यावे लागते. गुहेतील अंधारात सापही आहेत. बऱ्याच वेळा आत गेलेले लोक दगडांमध्ये अडकुन पडतात. आत प्राणवायूची असलेली कमतरता आणि अचानक पाणी वाढण्याच्या घटनांमुळे लोक दगावतात. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकाच वेळी अठरा कासव सुद्धा लोकांना सापडलेले आहेत. कासवाच्या मटणाला औषधीय गुणसूत्रे असल्याचे लोक मानतात. त्यासाठी मोठया प्रमाणावर कासवाचे मांस खाल्ले केले जात आहे. दोन युवकांच्या मृत्यूमुळे चोरीछुपे कासवाच्या होत असलेल्या शिकारीच्या प्रकरणाला वाचा फुटली आहे.

निसर्गाचे भरभरून दान

सांगेच्या नेत्रावळी पंचायतीला निसर्गाने भरभरून दिले आहे. हिरवीगार शेती, उंच डोंगर, वेर्ले तुडवसारखे थंड गाव आणि मैनापी आणि सावरीसारखे डोळ्यांचे पारणे फेडणारे धबधबे, अशी अनेक नैसर्गिक पर्यटन स्थळे नेत्रावळीचे आकर्षण आहेत. निसर्गाचे हे भरभरून दान जपले पाहिजे आणि त्यासाठी कासवांची हत्या थांबवलीच पाहिजे. असे मत पर्यावरण प्रेमी व्यक्त करत आहेत.

Back to top button