मोपा विमानतळाला मनोहर पर्रीकर यांचे नाव, आज पहिले विमान उतरणार | पुढारी

मोपा विमानतळाला मनोहर पर्रीकर यांचे नाव, आज पहिले विमान उतरणार

पणजी : पुढारी वृत्तसेवा : गोव्याचे भूषण ठरणार असलेला व गोव्याच्या विकासामध्ये महत्त्वाचे योगदान देणाऱ्या मोप येथील मनोहर पर्रीकर आंतरराष्ट्रीय विमानतळ गुरुवार, ५ जानेवारीपासून प्रत्यक्षात सुरू होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विमानतळाचे अलीकडेच उद्घाटन केले होते. ३ हजार कोटी रुपये खर्च करून हा विमानतळ मोप येथे बांधलेला आहे. त्या विमानतळाचे नाव मनोहर पर्रीकर यांच्या नावे झालेले आहे.

दुसरीकडे या विमानतळावरील टॅक्सीचा विषय अधांतरीच राहिला असला, तरी गोवा सरकारने विमानातून येणाऱ्या प्रवाशांसाठी कदंबच्या इलेक्ट्रॉनिक वोल्वो वातानुकूलित बसेस सुरू केल्या आहेत. या बसेस मडगाव, कळंगुट व म्हापसा, पणजी या भागांमध्ये दर तासाने प्रवाशांची ने-आण करणार आहेत. त्यासाठी मडगाव ५०० रुपये, पणजी म्हापसा २०० रुपये व कळंगुट २५० रुपये असा दर ठरविला आहे. गोव्याच्या विकासामध्ये महत्त्वाचे योगदान देणारा हा विमानतळ ठरणार असून अनेक अडथळ्यानंतर जीएमआर या कंपनीने हा विमानतळ बांधलेला आहे. पेडणे तालुक्यातील शेकडो लोकांना या विमानतळावर रोजगार प्राप्त झालेला असून टॅक्सी व्यवसाय व इतर इतर माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात येथे रोजगार निर्माण होणार आहे.

एकूणच गोव्याच्या विकासाचा केंद्रबिंदू ठरलेला मनोहर पर्रीकर आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्यापासून देशी आणि परदेशी प्रवाशांच्या सोयीसाठी खुला होत असून केंद्रीय नागरी उड्डाण खात्याच्या मंत्रालयाने ५ जानेवारीपासून हा विमानतळ सुरू होणार असल्याचे यापूर्वीच घोषित केले आहे. टॅक्सीवाल्यांचे आडमुठे धोरण मोप येथील मनोहर पर्रीकर आंतरराष्ट्रीय विमानतळासारखा जागतिक दर्जाचा विमानतळ ज्या तालुक्यात झाला आहे त्या तालुक्यातील टॅक्सीचालकांनी मात्र आडमुठे धोरण स्वीकारले आहे.

गोवा सरकारने या विमानतळावर काळ्या पिवळ्या टॅक्सींना स्टैंड नाकारला होता. त्यामुळे तो मिळावा यासाठी टॅक्सीचालकांनी आंदोलन केले. शेवटी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांच्यासह टॅक्सीचालकांची भेट घेतली. सरकार झुकले व काळ्या पिवळ्या टॅक्सी स्टैंड मंजूर केला. पहिल्या टप्प्यात १०० टॅक्सींना मान्यताही दिली. मात्र, आता काही टॅक्सीवाले सरकारची पुन्हा अडवणूक करत असून १०० नको पेडणे व मांद्रेतील सर्व (सुमारे १०००) टॅक्सींना सामावून घ्या, अशी मागणी करून पुन्हा आंदोलन करीत आहेत.

पहिल्या टप्प्यात इतक्या जनाना सामावून घेणे अशक्य असल्याचे सांगूनही ते एकत नाहीत. त्यामुळे टॅक्सीचालकांचे आडमुठे धोरण पुढे आले असून त्यांनी आपली भूमिका बदलणे गरजेचे आहे. … तर जगभर बदनामी टॅक्सीचालकांनी मुरगाव येथे क्रुझवर आलेल्या अमेरिकेच्या पर्यटकांना माघारी पाठवण्याची घटना ताजी आहे. त्यामुळे जगात गोव्याची बदनामी झालेली आहे. आता पेडणेतील टॅक्सीचालकांच्या आडमुठ्या धोरणामुळे विमान प्रवाशांना त्रास होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास पुन्हा गोव्यावर नामुष्की येईल आणि त्याचा परिणाम म्हणून पर्यटक गोव्याकडे पाठ फिरवण्याची शक्यता आहे.

‘मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नामकरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पद्मभूषण कै. मनोहर पर्रीकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मोप ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ असे करण्यास मान्यता देण्यात आली. माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले पर्रीकर यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ मोप असे नाव देण्याचा एकमताने निर्णय घेतला आहे. मात्र, लोकांची मागणी ही मनोहर पर्रीकर असे पूर्ण नाव देण्याची आहे, ती मात्र अपूर्णच राहिली आहे.

Back to top button