अभी तो पार्टी शुरू हुई है…. : गोव्यात पर्यटकांची जत्रा, पार्ट्यांची धूम, बेधूंद जल्लोषी वातावरण | पुढारी

अभी तो पार्टी शुरू हुई है.... : गोव्यात पर्यटकांची जत्रा, पार्ट्यांची धूम, बेधूंद जल्लोषी वातावरण

पणजी/म्हापसा/पेडणे; पुढारी वृत्तसेवा : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे जल्लोषात जंगी स्वागत करण्यासाठी लाखो पर्यटक गोव्यात दाखल झाले आहेत. नववर्षाच्या स्वागताच्या पार्ट्यांची धूम सुरू झालेली आहे. नाईट लाईफ पार्ट्यांतील वाद्यांच्या दणदणाटाने किनारपट्टी सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत अखंड जागी आहे. खुल्या जागेतील ध्वनिक्षेपक रात्री 10 नंतर बंदच करा, हा न्यायालयाचा आदेश कागदावरच आहे.

बार्देश तालुक्यातील जगप्रसिद्ध कळंगुट समुद्रकिनार्‍यासह कांदोळी, बागा, वागातोर, हणजूण, पेडणे तालुक्यातील आश्वे, मांद्रे, मोरजी, हरमल तसेच दक्षिणेतील पाळोळे, कोलवा, बाणावली आदी समुद्र किनारी देशी तसेच परदेशी पर्यटकांची जत्राच भरलेली आहे. संगीताच्या तालावर अनेक देशी-परदेशी पर्यटकांनी ताल धरलेला आहे. त्यांचे थिरकणे अन्य पर्यटक गटागटाने पाहत आहेत. शाकाहारी, मांसाहारी खाद्यपदाथार्ंची प्रचंड रेलचेल आहे. समुद्रकिनारी वार्‍याच्या झोताबरोबर खाद्यपदार्थांचा घमघमाटही फिरस्त्यांना जाणवतो.

ड्रग्जची रेलचेल

इलेक्ट्रॉनिक नृत्य महोत्सव तसेच डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यातील पार्ट्यांमध्ये अमली पदार्थांचा व्यवहार होतो. काहीजण अमली पदार्थ घेऊन रात्रभर तासन्तास थिरकतात. कोठे, कोणता अमली पदार्थ कसा मिळेल, किती रुपयापर्यंत मिळेल, याच्या सांकेतिक गुपचूप प्रचार झाल्याची चर्चा आहे.

तू मारल्यासारखे कर…

मराठीत एक म्हण आहे, तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो. तसे सध्या किनारपट्टीतील पार्ट्यांबाबत म्हणता येईल. रात्री 10 नंतर खुल्या जागेतील ध्वनिक्षेपक बंदच करा, असा न्यायालयाचा इशारा आहे. तो मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिलेला आहे. तो कागदावरच आहे. पंच, सरपंच, पंचायत, स्थानिक पोलिस यंत्रणा, स्थानिक सरकारी बाबू नेमके कोठे आहेत आणि ते काय करतात? हा संशोधनाचा विषय. न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीबाबत जे काही सुरू आहे ते कागदावरच. प्रत्यक्षात किनारे अखंड जागते आहेत.

आज काय होणार?

आज 31 डिसेंबर. हा आता सणच झालेला आहे. या दिवशी पार्टी नाही केली तर पाप वगैरे लागेल अशी लोकधारणा झालेली आहे. त्यामुळे गावागावात, शहराशहरात तसेच किनारपट्टीत पार्ट्यांचे जंगी नियोजन केले आहे. सर्व शासकीय यंत्रणा आजच्या पार्ट्यांविषयी काही कारवाई करण्याची शक्यता कमीच.

हणजूण-कायसुव पंचायत क्षेत्रातील वागातोर येथे मैदानावर इलेक्ट्रॉनिक नृत्य महोत्सव (इडीएम) सुरू आहे. तेथे न्यायालयाच्या आदेशाचे पालन करताना रात्री 10 नंतर ध्वनिक्षेपक बंद केला जातो. या सर्वात मोठ्या पार्टीस लक्षणीय संख्येने देशी-परदेशी पर्यटक असतात. ही पार्टी दहाला बंद होते आणि पर्यटकांची पावले अन्य किनारी आयोजिलेल्या पार्ट्यांकडे वळतात.

तेथे सूर्योदयापर्यंत धिंगाणा सुरू राहतो. त्यासाठी किनारपट्टीतील नानाविध नाईट क्लबनी जंगी तयारी केलेली आहे. समाजमाध्यमात त्याचा प्रचारही केलेला आहे.

अनेकांनी रात्री संगीत वाजवण्यास परवाना घेतल्याची जाहीरातही गुपचूप केलेली आहे. पार्टीची कागदावरची वेळ आणि पार्टी संपल्याची वेळ यामध्ये सूर्योदय आणि सूर्यास्तासारखे अंतर असते.

Back to top button