गोवा : राज्यात पर्यटकांची ‘हाऊसफुल्ल’ गर्दी

गोवा : राज्यात पर्यटकांची ‘हाऊसफुल्ल’ गर्दी
Published on
Updated on

पणजी/मडगाव; पुढारी वृत्तसेवा :  नाताळ आणि नववर्षाला अजून दहा दिवस बाकी असले तरी राजधानी पणजीसह, उत्तर गोव्यातील कळंगुट, बागा, कांदोळी भागातील छोटी मोठी हॉटेल्स आतापासूनच फुल्ल झाली आहेत. पर्यटकांचा वाढता प्रतिसाद पाहता बहुतेक हॉटेल्सचे दरही वाढले आहेत. कोव्हिडनंतर प्रथमच एवढा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने पर्यटनावर अवलंबून असणारे व्यावसायिक आनंदी आहेत. उत्तर गोव्याप्रमाणेच दक्षिण गोव्याचीही स्थिती अशीच आहे.

20 डिसेंबरपर्यंत पणजीतील एसी हॉटेल्सचे दर एक ते दीड हजार रुपये प्रतिदिवस आहेत. 20 ते 24 पर्यंत हेच दर दोन हजार, काही ठिकाणी तीन हजार रुपये प्रतिदिवस असा आहे. 31 डिसेंबर, 1 जानेवारी रोजी हेच दर प्रतिदिवस पाच ते सहा हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. याशिवाय गेस्ट हाऊस, होम स्टे, हॉस्टेलचेही दर वाढले आहेत. तीन व पंचतारांकित हॉटेल्सचे दर दिवसाला 10 ते 30 हजार रुपयांपर्यंत आहेत. दरवाढ झाली तरीही मोठ्या प्रमाणात खोल्यांचे आरक्षण सुरू झाले आहे.

याबाबत कळंगुट येथील एका हॉटेल व्यावसायिकाने सांगितले की, यंदाच्या पर्यटन हंगाम चांगला जाईल. 25, 31 डिसेंबरसाठी ऑनलाईन बुकिंग होत आहे. आम्हाला फोनवरूनही विचारणा होत आहे. आम्ही हंगाम नसताना 50 टक्के सवलतीत खोल्या दिल्या आहेत. हंगामात मात्र दरवर्षीच दरात वाढ होते. यात नवीन असे काही नाही.

कांदोळी येथील शॅक व्यावसायिक स्टेसी डिसोझा यांनी सांगितले की, यंदा 25 डिसेंबर आधीच पर्यटकांची संख्या वाढली आहे. 25 नंतर एक जानेवारी पर्यंत आणखी पर्यटक येण्याची शक्यता आहे. मागची तीन वर्षे कोव्हिडमुळे व्यवसाय झाला नव्हता. यंदा मात्र कोव्हिड पूर्वीसारखा व्यवसाय होण्याची आशा आहे.

दक्षिणेच्या किनारपट्टीत हॉटेल्स आतापासूनच फुल्ल झालेली आहेत. आता दाखल झालेले पर्यटक जानेवारीच्या दुसर्‍या आठवड्यात गोव्यातून माघारी फिरणार आहेत. मासळी, मद्य आणि संगीत अशी गोव्याबाबतची संकल्पना पर्यटकांमध्ये रुजल्याने खास त्यासाठीच पर्यटक नवीन वर्ष साजरे करण्यासाठी गोव्यात येतात. राज्यात वर्षभर चालणारे उत्सव, सामाजिक मेळावे आणि संगीत यांचा समावेश असलेले कार्यक्रम विशेषतः संध्याकाळी होतात.

केळशी येथील ग्रीन रिसोर्टचे मालक डिक्सन वाझ म्हणाले की, गोवा राज्य अन्य राज्यांपेक्षा वेगळे आहे. रात्री दहा वाजता संगीत बंद केले, तर त्याचा परिणाम हॉटेल्स आणि शॅक्सवर होईल. कॅटरिंग आणि हॉटेल व्यावसायिकांना याचा फटका बसणार आहे. राज्यातील चाळीसही आमदारांनी जनतेच्या हितासाठी कायद्यात सुधारणा करण्यासाठी त्यावर विचार करणे अत्यंत गरजेचे आहे. सरकारने हस्तक्षेप करून हा प्रश्न सोडवावा, असे मत त्यांनी व्यक्त केले.

रात्री दहानंतर नो म्युझीक

रात्री दहा वाजता संगीत बंद करण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाने पर्यटन व्यावसायिकांचे धाबे दणाणलेत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी किनारपट्टीत दाखल झालेल्या पर्यटकांना उशिरापर्यंत चालणार्‍या पार्ट्यांचे जास्त आकर्षण असते. रात्री दहा नंतर संगीत बंद करण्याच्या आदेशामुळे पर्यटकांचा हिरमोडही झालेला आहे. वर्षअखेरच्या पर्यटन हंगामावर विपरीत परिणाम होईल, अशी भीती हॉटेल व्यावसायिक आणि शॅक्स मालकांना सतावू लागली आहे.

पर्यटकांना लुबाडू नये

हॉटेल मालक संघटनेचे अध्यक्ष गौरीश धोंड यांनी सांगितले की, यंदा पर्यटकांचा मोठा प्रतिसाद असल्याने व्यवसाय चांगला होणार आहे. बहुतेक हॉटेल्स फुल्ल झाली आहेत. हंगाम असल्याने थोडी दरवाढ होतेच. पण काही टॅक्सी चालक आणि हॉटेल्सवाले अव्वाच्या सव्वा दर लावून पर्यटकांना लुटू शकतात. पाच हजारची रूम वीस हजार रूपयाला देणे किंवा टॅक्सीसाठी भरमसाठ दर लावणे चुकीचेच आहे. यावर आळा घातला पाहिजे.

पर्यटनाला चालना मिळणार

गोवा ट्रॅव्हल अँड टूरिझम संघटनेचे अध्यक्ष निलेश शहा यांनी सांगितले की, यंदा पर्यटकांचा प्रतिसाद हा कोव्हिडपूर्वी सारखाच चांगला आहे. या महिन्यात 25, 31 डिसेंबर हे आहेतच शिवाय सेरेंडीपीटी, सनबर्न अशा महोत्सवामुळे पर्यटनात आणखी वाढ होईल. सध्याही हॉटेलमध्ये बुकिंग मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news