गोवा : 10 हजारांसाठी ओडिशाहून घेऊन आली गांजा ; गरीब विधवेचे कृत्य | पुढारी

गोवा : 10 हजारांसाठी ओडिशाहून घेऊन आली गांजा ; गरीब विधवेचे कृत्य

मडगाव;  विशाल नाईक :  मुलांचे पालन पोषण आणि कुटुंबाच्या पोटाची खळगी भरण्यासाठी ओडिशातील गरीब विधवा ड्रग्ज माफियांसाठी काम करू लागल्या आहेत. ओडिशातून मडगावात साडेपाच लाख रुपये किमतीचा गांजा उतरवण्यासाठी आरती नायक या विधवेेला दहा हजार रुपये मिळणार होते; पण पोलिसांच्या कारवाईचा सुगावा लागताच गांजा घेण्यासाठी येणार्‍या त्या इसमाने मोबाईल बंद केला आणि आरती पोलिसांच्या तावडीत सापडली.

आरती हिच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. तिला दोन मुले आहेत. घरची स्थिती अतिशय बेताची आहे. तिने ओडिशातून गोव्यात गांजा पोहोेचवण्याचा निर्णय घेतला होता. ओडिशा हे गांजा लागवडीचे प्रमुख ठिकाण असून येथील जंगलात मोठ्या प्रमाणावर गांजाची लागवड केली जाते. उच्च दर्जाच्या या शिलावती गांजाला डिसेंबर महिन्यात गोव्यातील पार्ट्यांमध्ये मोठी मागणी आहे. तीच संधी
साधून गोव्यातील पेडलर्स ओडिशा बरोबर कर्नाटक राज्यातून सुध्दा गांजा मागवू लागले आहेत. गोव्यात जरी साडेपाच किलो गांजाची किंमत साडेपाच लाख रुपये असली तरीही ओडिशात तो गांजा तेरा हजार रुपये प्रती किलो या दराने विकला जात आहे.

गोव्यातील बरेच पेडलर्स पोलिसांच्या रडारखाली आहेत. त्यांच्या हालचालीवर पोलिस लक्ष ठेवून असल्याने आता गांजा पिकवणार्‍यांवरच गांजा गोव्यात पाठवून देण्याचे काम सोपविले आहे.आरती हिला मडगावात येऊन एका व्यक्तीला फोन करून तो गांजा त्याच्या स्वाधीन करायचा होता असे पोलिस निरीक्षक तुळशीदास नाईक यांनी सांगितले.ती पाहिल्याच वेळा गांजा घेऊन गोव्यात आली होती. चौकशीसाठी तीला चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.

Back to top button