माघार नाहीच, भूमिकेवर ठाम; काश्मीरमधील शोकांतिकेबाबत नव्हे तर चित्रपटाबद्दल बोललो : नादाव लापीद | पुढारी

माघार नाहीच, भूमिकेवर ठाम; काश्मीरमधील शोकांतिकेबाबत नव्हे तर चित्रपटाबद्दल बोललो : नादाव लापीद

पणजी; पुढारी वृत्तसेवा : मी काश्मीरमध्ये घडलेल्या घटकांबाबत किंवा शोकांतिकेबाबत बोललो नाही. तर एक तज्ज्ञ म्हणून ‘दि काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाबद्दल बोललो आहे, अशी प्रतिक्रिया इस्रायली दिग्दर्शक आणि इफ्फीच्या आंतरराष्ट्रीय विभागाचे परीक्षक नादाव लापीद यांनी दिली. बुधवारी त्यांनी एका खासगी वृत्त वाहिनीला मुलाखत दिली. मी माझ्या वक्तव्यावर ठाम असून ते मी मागे घेणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

लापीद म्हणाले की, एखादी शोकात्मक घटना घडली असेल, तर चित्रपट निर्माता म्हणून त्यावर गंभीर चित्रपट काढणे ही आपली जबाबदारी असते. मात्र, काश्मीर फाईल्सच्या बाबत अगदीच उलटे घडले आहे. त्यांनी चित्रपटातील दृश्ये, संगीत, चांगल्या आणि वाईट पात्रांची हाताळणी अशा पद्धतीने केली की तो प्रचारकी आणि असभ्यच ठरतो. त्यांनी या सर्वांमध्ये फेरफार केल्याचे जाणवते. याआधीही अशा घटनांचा वापर करून वापर करून प्रचारकी चित्रपट काढले गेले आहेत.

ते म्हणाले, सध्या माझ्या वक्तव्यावरून राजकारण केले जात आहे. इस्रायलचे राजदूत नाओर गिलीन यांनी माफीही मागितली. परंतु मी सांगू इच्छितो की, मी एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून,चित्रपट समीक्षक म्हणून आणि परीक्षक पॅनेलचा अध्यक्ष म्हणून माझे मत मांडले. मी कुणाची खासगी मालमत्ता नाही. कोणत्याही वादातून स्वतःचा फायदा करून घेणे हे राजकारणी लोकांना चांगले जमते. असे लोक इस्रायल आणि भारतातही आहेत.

इफ्फीच्या समारोप सोहळ्यात लापीद यांनी ‘काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट असभ्य आणि प्रचारकी असून अशा चित्रपटाची निवड होणे धक्कादायक असल्याचे म्हणले होते. यावर चांगलाच गदारोळ झाला. त्यांच्या वक्तव्याबाबत राजदूत गिलीन यांनी आयोजकांची माफी मागितली होती. तर अभिनेता अनुपम खेर आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी लापीद यांच्यावर टीका केली होती.

Back to top button