गोव्यात आजपासून इफ्फी; रंगारंग कलाविष्कार | पुढारी

गोव्यात आजपासून इफ्फी; रंगारंग कलाविष्कार

पणजी; पुढारी वृत्तसेवा : भारताच्या ५३ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) चा पडदा आज, रविवारी (२० नोव्हेंबर) उघडणार आहे. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, या खात्याचे राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगण यांच्यासह अजय देवगण, सारा अली खान, जॉकी श्रॉफ, वरुन धवन, प्रभूदेवा, अमृता खानवीलकर आदी कलावंतांची मांदियाळी उद्घाटनाला उपस्थित राहणार आहे.

पणजीपासून जवळच असलेल्या बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास रंगारंग कलाविष्कारासह इफ्फीस प्रारंभ होईल. यंदा संगीत वाद्याच्या आकारात मोरांच्या कलाकृती उभारल्या आहेत. देश-परदेशी कलावंतांसह इफ्फीच्या प्रतिनिधींच्या स्वागतासाठी राजधानी पणजी सजलेली आहे. दयानंद बांदोडकर मार्गाच्या दोन्ही बाजूच्या झाडावर तसेच इमारतीवर लोभस रोषणाई केलेली आहे. इफ्पीचे बोधचिन्ह मोराच्या लक्षवेधी प्रतिकृतीमुळे सजलेली पणजी जास्तच आकर्षक दिसत आहे. गोवा सरकारची मनोरंजन संस्था राष्ट्रीय चित्रपट महासंचालनालयाच्या सहकार्याने इफ्फीचे आयोजन होत आहे. इफ्फीनिमीत्त केलेल्या सजावटीमुळे राजधानी पणजीचे सौंदर्य खुलले आहे. मुख्य बसस्थानकाजवळील दिवजा सर्कल ते इफ्फीचे उदघाटन व समारोप होणार असलेल्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमपर्यंत विजेच्या खांबावर मोरांच्या प्रतिकृती लावलेल्या आहेत. इफ्फीचे मुख्यालय असलेल्या आयनॉक्स परिसरात आगळीवेगळी आणि भरगच्च रोषणाई केल्यामुळे सेल्फी घेण्यात तरुण गटागटाने व्यस्त आहेत.

आशा पारेख यांचे तीन चित्रपट

महोत्सवात ५२ व्या दादासाहेब फाळके पुरस्काराच्या मानकरी आशा पारेख यांच्या भूमिकांनी गाजलेले तिसरी मंजील, दो बदन आणि कटी पतंग या तीन चित्रपटांच्या माध्यमातून त्यांच्या कारकिर्दीवर दृष्टिक्षेप टाकण्यात येणार आहे.

एनएफडीसीचे प्रथमच आयोजन

राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) यंदा प्रथमच या महोत्सवाचे आयोजन करत आहे. त्यांनी आयोजनात काही स्वागतार्ह बदल केले आहेत. प्रारंभीच्या चित्रपटाचा खेळ अगोदर होईल, त्यानंतर उद्घाटनाचा रंगारंग कलाविष्कार असेल.

Back to top button