गोवा : एकीकडे दारूचा महापूर; दुसरीकडे जपली ‘ग्रामसंस्कृती’ | पुढारी

गोवा : एकीकडे दारूचा महापूर; दुसरीकडे जपली ‘ग्रामसंस्कृती’

पणजी; विठ्ठल गावडे-पारवाडकर : गोवा म्हणजे दारूचा महापूर, अशी या पर्यटननगरीची जगभर प्रतिमा आहे. ही प्रतिमा अर्धसत्य आहे. चिमुकल्या गोव्यात एकूण 388 गावे आहेत. काही गावे खूपच छोटी म्हणजे वाड्यावस्त्या म्हणता येतील, अशी आहेत. 388 पैकी सुमारे 50 वर गावांत एकही बार नाही. दारू विक्रीचे दुकानही नाही. इतकेच नव्हे, तर दारूची ‘भाटी’ (भट्टी) नाही. या गावांनी दारू दुकानांना प्रवेशबंदी करून ग्रामसंस्कृती जपली आहे. विशेष म्हणजे, यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे कोठंबी गावही आहे.

असा आहे या पन्नासवर गावांचा चेहरा…

बार नसणारी पन्नासवर गावांपैकी बहुतेक गावे निसर्गाच्या कुशीत आहेत. गावपण टिकलेली ही गावे आहेत. राज्याच्या अंतर्गत भागात ही गावे आहेत. या गावांना शहरीकरणाचे वेध लागलेले नाहीत. जल-जमीन आणि जंगल क्षेत्राचा हेवा वाटावा, असा या गावांचा चेहरा आहे. अंतर्गत भागातील या गावांमध्ये पर्यटन पोहोचलेले नाही. परिणामी, तुलनेत पर्यावरणाची जपणूक झालेली आहे. या गावांतून गरजेपुरती वाहतूक होते, त्यामुळे ध्वनी प्रदूषण तुलनेत खूपच कमी. शुद्ध हवा, शुद्ध पाणी, पारंपरिक जीवनशैली, पारंपरिक गोमंतकीय खाद्यसंस्कृती, लोकसंस्कृतीचे दर्शन, अशा गावांत होते. सत्तरी तालुका हा पश्चिम घाटाच्या गोव्यातील रांगेच्या पायथ्याशी येतो. जंगल क्षेत्राची काही एक जपणूक झालेली आहे. कर्नाटकच्या सीमेवर सुर्ला नामक गाव आहे. ते गोव्याच्या हद्दीत आहे. तेथे घरे आहेत 40 आणि बार होते बारा. तळीराम, पर्यटकांच्या त्रासाला कंटाळून गावाने एकजुटीने निर्णय घेतला आणि सर्व बार कायमचेच बंद केले. आजही अशी एकी गावात आहे. काही गावांत धार्मिक श्रद्धांची जपणूक म्हणूनही बार चालू करता येत नाहीत. अंतर्गत भागात पर्यटन नेणारच,
असा सरकारचा निर्धार प्रत्यक्षात अवतरला; तर गावांच्या या चेहर्‍याला मात्र गालबोट लागू शकते.

एकूण 12 हजार 606 बार आहेत. जगप्रसिद्ध समुद्रकिनारे असणार्‍या बार्देश तालुक्यात सर्वाधिक 4 हजार 177 बार आहेत. पश्चिम घाटाच्या रांगेच्या पायथ्याशी वसलेल्या सत्तरी या तालुक्यात सर्वाधिक कमी म्हणजे 251 बार आहेत. या तालुक्यात जंगल परिसर येतो. दरवर्षी सरासरी 50 ते 75 नवे बार नोंद होतात. गोव्यात दक्षिण गोवा आणि उत्तर गोवा, असे दोन जिल्हे आहेत. 191 ग्रामपंचायती व 14 पालिका आहेत. पणजी ही एकच महापालिका आहे. बारा तालुके आहेत. 25 हजारांच्या आसपास मतदान असणारे 40 विधानसभा मतदारसंघ आहेत. गोव्यातील काही पंचायत क्षेत्रातील विशेषतः दुर्गम गावांत बार नाहीत.

सुमारे पंधरा लाख लोकसंख्येच्या गोव्याला वर्षभरात 45 लाखांच्या आसपास पर्यटक भेट देतात. त्यातील बहुतांश बार्देश तालुक्यातील समुद्रकिनारी भागात येतात. त्यामुळे तेथे बार जास्त आहेत. डिसेंबर 2021 पर्यंत बार्देश तालुक्यात बार, किरकोळ व घाऊक दारू दुकाने मिळून 4 हजार 177 बार नोंद आहेत. दुसर्‍या क्रमांकावर दक्षिण गोवा जिल्ह्यातील सासष्टी तालुका (2 हजार 381 बार) आहे. तिसर्‍या क्रमांकावर तिसवाडी तालुका (1 हजार 510 बार) आहे. राजधानी पणजी शहर तिसवाडी तालुक्यात येते. इतर तालुक्यांतील बारची संख्या एक हजारच्या घरात आहे.

गोवा अबकारी खात्याने दिलेल्या माहितीनुसार, खात्याकडे किरकोळ दारू विकणारे बार, बाटलीबंद दारू विक्री करणारे किरकोळ विक्रेते, घाऊक दारू विक्री करणारे दुकानदार, सी एल बॉटलिंग युनिट, डिस्टिलरी, वायनरी, ब्रिव्हरी, मायक्रो ब्रिव्हरी अशा विविध आठ विभागांत व नऊ उपविभागांत बारची नोंदणी होते. ते बार म्हणून मोजले जातात.

गोव्यात डिसेंबर 2021 पर्यंत घाऊक दारू विक्रीची दुकाने 296 आहेत. किरकोळ बाटलीबंद दारू विक्रीची 3 हजार 389 दुकाने आहेत. किरकोळ दारू विके्रेते, बार व तावेर्णांची संख्या 8 हजार 791 आहे. दारूचे मोठे व लहान उद्योग तसेच भाटी (भट्टी) मिळून 130 व्यावसायिकांची नोंद आहे. त्यामुळे राज्यात मागील वर्षाच्या अखेरपर्यंत बार व उत्पादनांची मिळून संख्या 12 हजार 606 आहे. गेल्या दहा महिन्यांत 70 च्या आसपास बारची नोंद झाल्याने ही संख्या 12 हजार 676 झाली.

मुख्यमंत्र्यांच्या गावी नाही बार

काही गावांत परंपरा जपण्यासाठी दारू विक्रीची दुकाने अथवा बार सुरू करत नाहीत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे गाव आहे कोठंबी. ते साखळी विधानसभा मतदारसंघात येते. या गावात बार नाही. तसेच श्री लईराई देवस्थान असलेल्या शिरगावसह इतर अनेक गावांत बार नाहीत. एका पाहणीनुसार, राज्यातील किमान पन्नासच्या आसपास गावांत बार नाहीत. ही बहुतांश गावे आतील भागात आहेत.

गोव्यातही दारू महागली आहे. त्यामुळे पर्यटक आता बारमध्ये दारू पितात; मात्र गावी दारू घेऊन परतत नाहीत. दिवाळीत पर्यटनस्थळे हाऊसफुल्ल होती. असे असूनही किरकोळ आणि घाऊक दारू विक्रेत्यांचा अपेक्षेप्रमाणे व्यवसाय झालेला नाही. गोवा सरकारने विविध कर कमी केले, तरच दारू स्वस्त होईल; मग पर्यटक दारू खरेदीही करतील.
– दत्तप्रसाद नाईक, अध्यक्ष, घाऊक व किरकोळ मद्य विक्रेता संघटना

Back to top button