गोवा : प्लंबर ते पायलट, रोजगार मेळाव्याला दुसऱ्या दिवशीही प्रचंड प्रतिसाद | पुढारी

गोवा : प्लंबर ते पायलट, रोजगार मेळाव्याला दुसऱ्या दिवशीही प्रचंड प्रतिसाद

पणजी; पुढारी वृत्तसेवा : गोवा सरकारच्या कामगार व रोजगार मंत्रालयातर्फे बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर दोन दिवशीय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या आज दुसऱ्या दिवशीही हजारो बेरोजगारांनी उपस्थिती लावली. प्लंबर पासून पायलटपर्यंतची पदे भरणाऱ्या कंपन्यांचा या मेळाव्यात सहभाग असल्याने तरूणांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

गोवा सरकारच्या कामगार खात्याने विविध कंपन्यांशी संपर्क साधून रोजगार मेळावा आयोजित केला आहे. १५५ पेक्षा जास्त कंपन्यांनी रोजगार मेळाव्यात आपले प्रतिनिधी पाठवले आहेत. मंगळवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व कामगार खात्याचे बाबूश मोन्सेरात यांच्या उपस्थितीत रोजगार मेळाव्याचे उद्घाटन झाले. काल जगभरातील १५५ पेक्षा जास्त कंपन्यांनी विविध दालनांमध्ये ५ हजार ५०० पेक्षा जास्त जागांसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. पहिल्या दिवशी सुमारे नऊ हजार उमेदवारांनी उपस्थिती लावली होती. त्यापैकी सुमारे एक हजार उमेदवारांची थेट निवड करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी उद्घाटनानंतर सरकारी नोकरीसाठी एक वर्षाचा अनुभव सक्तीचा करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. खाजगी क्षेत्रात एक वर्ष नोकरी केलेल्यांनाच सरकारी नोकरी मिळणार आहे. त्यामुळे सरकारी नोकरीच्या मागे न लागता तरुण-तरुणींना आता मिळेल ती खाजगी नोकरी करावी लागणार आहे.

या मेळाव्याबाबत बोलताना कामगार आयुक्त राजू गावस म्हणाले की, कोरोनामुळे बेरोजगारी वाढलेली आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यातील काही जण पुन्हा रोजगार मिळावा यासाठी रोजगार मेळाव्याला आले आहेत. उमेदवारांच्या वाढलेल्या संख्येमुळे रोजगार मेळावा दुसऱ्या दिवशीही घ्यावा लागला. एकूण पंधरा हजार उमेदवारांनी नोंदणी केली होती. पहिल्या दिवशी नऊ हजार उमेदवार आले होते. कंपन्यांनी किती जणांना नियुक्त केले आणि किती जणांना रोजगार मिळाला याची आकडेवारी दोन दिवसानंतर उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गोवा सरकारच्या कामगार खात्याने विविध कंपन्यांशी संपर्क साधून हा रोजगार मेळावा आयोजित केला आहे. १५५ पेक्षा जास्त कंपन्यांनी या रोजगार मेळाव्यात आपले प्रतिनिधी पाठले आहेत. प्रत्येकाने आपल्याकडे किती जागा आणि कोणत्या जागा आहेत, त्याची माहिती दालनाच्या बाहेर लावलेली असल्यामुळे प्रत्येक उमेदवाराला ती यादी वाचून आपण त्यासाठी पात्र आहे का, हे पाहून मुलाखत देणे शक्‍य होत आहे.

हेही वाचा :

 

Back to top button