गोवा : सीबीआय म्हणते, कुणी काम देता का काम? | पुढारी

गोवा : सीबीआय म्हणते, कुणी काम देता का काम?

पणजी; पुढारी वृत्तसेवा :  गेल्या पाच वर्षांत राज्यातील केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) भ्रष्टाचार विरोधी खात्याकडे भ्रष्टाचाराची एकही तक्रार आली नाही. त्यामुळे सीबीआय गोवा अधिकार्‍यांची परिस्थिती कोणी काम देता का काम? अशीच झाली आहे. या विभागाचे पोलिस अधीक्षक आशेष कुमार यांनी ही खंत व्यक्त केली. बुधवारी त्यांनी माध्यम प्रतिनिधींसोबत संवाद साधला. यावेळी पोलिस निरीक्षक संजीवन नाईक आणि अपर्णा चोपडेकर उपस्थित होत्या. गोव्यातील जनतेने न घाबरता पुढे येऊन तक्रार करावी, असे आवाहनही कुमार यांनी केले.

आशेष कुमार यांनी सांगितले की, गोव्यासारख्या राज्यात भ्रष्टाचाराची एकही तक्रार न येणे ही बाब खूपच गंभीर आहे. एकतर येथे अजिबात भ्रष्टाचार होत नसावा किंवा मग लोकांना काहीच फरक पडत नसावा, असा निष्कर्ष निघू शकतो. राज्यातील अनेक केंद्रीय अधिकारी गोव्यात कोट्यवधी रुपयांचे फ्लॅट घेत आहेत, गुंतवणूक करत आहेत; मात्र याविषयी कोणीही तक्रार करत नाही. आम्हाला तोंडी जरी सांगितले तरी आम्ही तपास सुरू करू शकतो. सीबीआयकडून कामाची अपेक्षा असेल तर तक्रारी येणेही आवश्यक आहे.

विभागाकडील महत्वाची प्रकरणे

या विभागाकडे 2015 मध्ये काणकोण येथे मृत्यू झालेल्या स्वीडिश नागरिक फेलिक्स डाहल यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. याबाबत 2018 मध्ये उच्च न्यायालयाने सीबीआय तपासाचे आदेश दिले होते. मात्र, 2022 मध्ये फेलिक्सच्या कुटुंबीयांनी हा तपास अत्यंत अव्यवस्थितपणे केला जात असल्याचा आरोप केला होता. तपास मुंबई कार्यालयाकडे सोपविण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

Back to top button