पणजी; पुढारी वृत्तसेवा : सप्टेंबरमध्ये पक्षांतर करून भाजपमध्ये सामील झालेल्या आठ आमदारांविरोधात काँग्रेस पक्ष अपात्रतेची याचिका दाखल करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सांगितले आहे. गोवा प्रदेश काँग्रेस समितीने हा निर्णय घेतला आहे.
पाटकर यांनी सांगितले की, अपात्रता याचिका दाखल करण्यासाठी आम्हाला गोवा विधानसभेच्या सभापती कार्यालयातून पक्षांतर केलेल्या मदारांविषयी काही तांत्रिक माहिती हवी होती. अनेक प्रयत्नांनंतर माहिती अधिकार कायद्यांतर्गत ती आम्हाला मिळाली आहे. या कागदपत्रांच्या आधारे आम्ही आता आठ बंडखोर आमदारांविरुद्ध अपात्रतेची याचिका दाखल करणार आहोत. आमदार अॅड. कार्लोस फरेरा म्हणाले की, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा मूळ राजकीय पक्ष आहे. त्याचे कोणतेही विलीनीकरण झालेले नाही याचा पुरावा आहे. त्यामुळे भारतीय राज्यघटनेच्या दहाव्या अनुसूचीच्या परिच्छेद 4 नुसार विलीनीकरण केलेल्यांना लाभ मिळतो हा दावा फोल ठरतो.
सप्टेंबरमध्ये आमदार दिगंबर कामत, मायकेल लोबो, डिलायला लोबो, केदार नाईक, राजेश फळदेसाई, संकल्प आमोणकर, रुडॉल्फ फर्नांडिस आणि अलेक्सो सिक्वेरा यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत ठराव मंजूर करून भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षाच्या आमदारांची संख्या दोन तृतीयांश असल्याने पक्षांतर करणारे पक्षांतर विरोधी कायद्यांतर्गत कारवाईपासून वाचतील. मागच्या विधानसभेत जुलै 2019 मध्ये काँग्रेसचे 17 पैकी 10 आमदार भाजपमध्ये विलीन झाले होते.