डिचोली; पुढारी वृत्तसेवा : चार वर्षांनंतर कर्नाटकाने पुन्हा कळसा प्रकल्पाच्या कामाला चालना देण्यासाठी वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत. म्हादई अभयारण्याच्या परिघात माती परीक्षण तसच इतर सर्व्हे करण्यास सुरुवात केली आहे. हलतरा व कळसा नाल्याचे पाणी वळवण्यासाठी माती परीक्षण प्रक्रिया सुरू केली आहे. पर्यावरण कार्यकर्ते यांनी या भागाला भेट दिली असता, ही बाब उघडकीस आली. 2006 पासून कर्नाटक निरावरी निगमतर्फे काम सुरू करण्यात येऊन मलप्रभेत पाणी वळविण्यात आले आहे.
सध्या मशिनरीच्या सहाय्याने माती परीक्षण सुरू केले आहे. हे सर्व्हे काम पूर्ण होताच, सर्व नाल्यांचे पाणी मलप्रभेत वळवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. सध्या गोव्याच्या सीमेलगत पाचशे मीटर परिसरात हे माती परीक्षण व सर्व्हे सुरू आहे, असे पर्यावरण तज्ज्ञ राजेंद्र केरकर यांनी सांगितले.
पाण्याच्या वाट्यासंदर्भात गोवा, महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांनी लवाद तसेच सर्वोच्च न्यायलयात याचिका दाखल केल्या आहेत. गेल्या चार वर्षांपासून हे प्रकरण अनिर्णित आहे. असे असतानाही कर्नाटक सरकारने सुधारित आराखडा करून आर्थिक तरतूद केली असून काम पूर्ण करण्यासाठी सर्व तयारी केली आहे.