गोवा : लोकांचे हाल; चक्का जाम … चोर्ला घाटात पाच तास कोंडी  | पुढारी

गोवा : लोकांचे हाल; चक्का जाम ... चोर्ला घाटात पाच तास कोंडी 

वाळपई; पुढारी वृत्तसेवा :  गोवा-कर्नाटक दरम्यानच्या चोर्ला घाट परिसरातील प्रवाशांना धोका निर्माण होत असल्यामुळे उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांनी या महामार्गावरून अवजड मालवाहतुकीला बंदी घातली होती. मात्र, तरीही अवजड वाहतूक सुरू असल्याने प्रवाशांना त्याचा फटका बसत आहे. रविवारी गोव्यातून कर्नाटकच्या दिशेने जाणारा अवजड ट्रक रस्त्याच्या बाजूला कलंडल्यामुळे घाटातील वाहतूक सुमारे 5 तास ठप्प झाली होती. शेकडो वाहने या महामार्गावरील रांगांमधून अडकून पडली होती.

अंजुणे धरण

प्रकल्पापासून काही अंतरावर एका वळणावर चालकाचा ताबा सुटल्यामुळे ट्रक रस्त्याच्या कडेला कंलडला. ही घटना सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास घडली. त्यामुळे दोन्ही भागातून होणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात अडकून पडली. रविवार असल्यामुळे गोव्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात बेळगाव शहरात खरेदीसाठी जातात. तसेच बेळगाव, तेलंगणा भागातून गोव्यात येणारे अनेक पर्यटक यामुळे अडकून पडले होते. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही वाहतूक सुरळीत करण्यात आली.

अवजड वाहन बंदी कागदावरच

तीन महिन्यांपूर्वी जिल्हाधिकार्‍यांनी गोव्यातून बेळगाव व बेळगावतून गोवा या भागामध्ये अवजड वाहतुकीला पूर्णपणे बंदी घातलेली होती. मात्र, या संदर्भाची अंमलबजावणी पोलिस खाते ववाहतूक खाते यांच्याकडून होत नसल्याचे निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे गेल्या एक महिन्यापासून सातत्याने या भागामध्ये वाहतुकीची कोंडी होताना दिसत आहे. त्यामुळे घाटातील अवजड वाहतूक बंदी ही केवळ कागदावरच असल्याचे दिसून येते.

संबंधित बातम्या

सुमारे 350 वाहने अडकली

प्रवाशांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, गोव्याच्या दिशेने येणारी कर्नाटक भागातील जवळपास 200 पेक्षा जास्त वाहने, तर गोव्यातून बेळगावच्या दिशेने जाणारे 150 पेक्षा जास्त वाहने अडकून पडली होती. यामध्ये प्रवासी वाहनांची संख्या जास्त होती.

बळी गेल्यावरच येणार का यंत्रणेला जाग?

गोवा-बेळगाव दरम्यानचा चोर्ला घाटमार्ग हा कमी अंतराचा असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक याच भागातून होत असते. अनमोड मार्ग सध्या दुरुस्तीसाठी बंद असल्यामुळे या महामार्गावरील वाहनाची संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढलेली आहे. मात्र, अवजड प्रकारच्या वाहतुकीमुळे प्रवासी वर्गांला धोका निर्माण होत असतो. त्यामुळे सरकारी यंत्रणा कोणाचा बळी गेल्यावरच जागी होणार का, असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत.

Back to top button