

पणजी; पुढारी वृत्तसेवा : राज्यात यापुढे सरकारी कर्मचारी भरती ही कर्मचारी भरती आयोगा मार्फतच होणार आहे. बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत कर्मचारी भरती आयोगासाठी लागणारा कर्मचारीवर्ग नियुक्त करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
आयोगातर्फे नोकर भरती होणार असल्याची घोषणा विधानसभा निवडणुकीपूर्वी केली होती. मात्र, निवडणुकीमुळे त्याची अंमलबजावणी केली नव्हती. मुख्यमंत्री म्हणाले, सौरऊर्जा निर्मिती खात्यासाठी पदनिर्मिती करण्याचा ठराव घेण्यात आला. इतर काही खात्यांमध्ये नव्या पदांची निर्मिती करण्याचा निर्णयही झाला. गोवा वैद्यकीय महाविद्यालय, बांबोळी येथील बायो कचरा विल्हेवाट प्रकरणी जादा सुविधा निर्माण करण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. म्हाऊस पंचायत क्षेत्रातील 300 चौै. मी. सरकारी जमीन पंचायतीकडे हस्तांतरित करण्याचा निर्णयही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाला. विविध खात्यांच्या खर्चांना यावेळी मान्यता दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
राज्यातील पंच सदस्यांशी शनिवारी (दि. 22) संवाद साधण्यासोबतच स्वयंपूर्ण गोवा अभियानाला सुरुवात होणार असल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले. या व्हीसी संवादामध्ये कौशल्य विकासावर भर असेल. इन्स्टिट्यूट मिनेझीस ब्रागांझा सभागृहातून हा संवाद साधला जाणार असून त्यापूर्वी राज्यातील नीट व सीईटी परीक्षांत अव्वल ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मंत्री तुमच्या दारी या उपक्रमामुळे त्या-त्या मंत्र्यांना विविध मतदारसंघांमध्ये त्यांच्या खात्याच्या रखडलेल्या प्रकल्पाची माहिती मिळाली व ते प्रकल्प मार्गी लागले. हा उपक्रम पुढील दोन महिन्यानंतरही सुरूच राहणार असल्याचे सांगून सरकार तुमच्या द्वारी उपक्रम पावसामुळे रद्द केला होता. तो येत्या महिन्यामध्ये सुरू होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
दि. 27 व 28 रोजी हरियाणा येथून प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि पोलिस प्रमुख यांच्याशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमात कायदा सुव्यवस्था, नवे उपाय आदींवर चर्चा होणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 ते 7 जानेवारी दरम्यान कर्नाटकात विकसित भारत, कौशल्य निर्मिती, पायाभूत सुविधा, तसेच बेरोजगारी या विषयावर चर्चा करण्यासाठी खास परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेत आपण सहभागी होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.