गोवा : कोण करणार मडगावचे नेतृत्व? आज होणार नगराध्यक्षपदाची निवड | पुढारी

गोवा : कोण करणार मडगावचे नेतृत्व? आज होणार नगराध्यक्षपदाची निवड

मडगाव; पुढारी वृत्तसेवा : विरोधकांनी रात्रीत गेम चेंज करून मडगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या खुर्चीपासून मागे खेचलेल्या दामोदर शिरोडकर हे मंगळवारी (11 रोजी) पुन्हा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. या निवडीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. गेल्या वेळी पाच नगरसेवकांनी दगा दिल्याने त्यांच्या हातून नगराध्यक्षपद निसटले होते. यावेळी दामोदर यांच्या बाजूने सोळा नगरसेवकांचे बळ आहे. शिवाय आमदार विजय सरदेसाई यांनी आपले सातही नगरसेवक निवडणुकीवर बहिष्कार घालतील, असे स्पष्ट केल्याने शिरोडकर यांच्यासाठी नगराध्यक्षपदाची दारे पूर्णपणे उघडी झाली आहेत.

सातच दिवसांत तत्कालीन नगराध्यक्ष घनश्याम शिरोडकर यांच्यावर अविश्वास ठराव आणून त्यांना पायउतार करण्यात आले होते. सरकारने पालिका कायद्यात वटहुकूम काढून गुप्त मतदानाऐवजी हात वर करून मतदान करण्याच्या कायद्यात बदल केला होता. सध्या दिगंबर कामत आणि भाजपाचा मूळ गट एकत्र आलेला आहे. कामत यांच्या सातही नगरसेवकांनी नुकतेच भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांच्या एकूण नगरसेवकांची संख्या पंधरा झाली आहे. त्यात आमदार विजय सरदेसाई यांच्याकडे असलेल्या आठ नगरसेवकांपैकी राजू नाईक यांनी भाजपात प्रवेश केल्याने भाजपाच्या एकूण नगरसेवकांची संख्या सोळा झाली आहे.मात्र, पार्वती पराडकर यांची भूमिका अजून गुलदस्त्यात आहे.सरदेसाई यांचे नगरसेवक बुधवारी होणार्‍या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत सहभागी होणार नसले तरीही घनश्याम शिरोडकर आणि पार्वती पराडकर यांनी मात्र आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. गेल्या वेळी प्रामाणे क्रॉस वोटिंग होऊ नये यासाठी भाजपाकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरु आहे.

भाजप नगरसेवक तारांकित हॉटेलमध्ये

गेल्या गेली प्रमाणे गेम चेंज होऊ नये यासाठी भाजपाने सर्व सोळाही नगरसेवकांना सोमवारी सायंकाळी चारच्या दरम्यान सासष्टीतील एका तारांकित हॉटेलवर हलवले आहे. बुधवारपर्यंत सर्व नगरसेवकांना त्या हॉटेलमध्ये ठेवले जाणार असून तेथून ते थेट मतदानासाठी पालिकेत येणार आहेत.

Back to top button