गोवा : पार्सेतील ती महिला मनोरुग्ण; समाजमाध्यमांत व्हिडीओद्वारे चुकीचा संदेश | पुढारी

गोवा : पार्सेतील ती महिला मनोरुग्ण; समाजमाध्यमांत व्हिडीओद्वारे चुकीचा संदेश

पेडणे; पुढारी वृत्तसेवा :  पार्से येथे शुक्रवारी कर्नाटक नोंदणी असलेल्या गाडीतून उतरलेली एक बुरखाधारी महिला एका इसमासह हॉटेलात आली. त्या ठिकाणी ते दोघे चहा पित असता तिथे असलेल्या लोकांत त्यांच्याविषयी संशय निर्माण झाला. सध्या गोव्यातील शाळातून मुले अपहरणाच्या चर्चा असताना त्या ठिकाणी आलेली ती बुरखाधारी महिला अपहरणकर्ती असल्याच्या संशयावरून त्यांची झडती घेतली असता, ती महिला मनोरुग्ण असल्याचे निष्पन्न झाले.

या विषयीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे या प्रकरणावर अखेर पडदा पडला.त्या मनोरुग्ण महिलेला अखेर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. याबाबत पार्सेचे सरपंच अजय कळंगुटकर यांनी दिलेली माहिती अशी की, काल पार्से येथे एका कर्नाटक नोंदणी असलेल्या गाडीतून एक बुरखाधारी महिला व पुरुष उतरून एका हॉटेलमध्ये गेले. लोकांनी त्यांना अपहरणकर्ते समजून पकडले. त्यांची झडती घेत असताना त्या इसमाने सांगितले की, आपण गाडीतून या बाजूला येत असताना या महिलेने माझ्याकडे लिफ्ट मागितली. ही महिला माझ्या ओळखीची नाही, मी तिला माणुसकी दाखवून गाडीत घेतले. पार्से येथे पोचल्यावर मी तिला गाडीतून उतरण्यास सांगितले; मात्र ती उतरण्यास तयार नव्हती. त्यामुळे मी तिला घेऊन या हॉटेलमध्ये आलो. तिला नाश्ता दिला; मात्र ती माझी पाठ सोडायला तयार नाही. ती मनोरुग्ण असल्याचे या इसमाने सांगितले. त्यानंतर आमची खात्री झाली की, ती महिला मनोरुग्णच आहे.

मी महिला पोलिसांना (पिंक) फोन करून या विषयी माहिती दिली. ही मनोरुण महिला एखाद्या शाळेजवळ गेली असती, तर तिला अपहरणकर्ती समजून लोकांनी तिला झोडपलं असतं, म्हणून आम्ही तिला पोलिसांच्या स्वाधीन केलं. दरम्यान, अपहरणकर्ते म्हणून ताब्यात घेतलेला प्रत्येक जण मनोरुग्ण असल्याचे आढळून आल्याने अपहरण अफवा ठरत आहे.

Back to top button