गोवा : अवैध वास्तव्य करणार्‍या बांगलादेशींना परत पाठविणार – मुख्यमंत्री सावंत | पुढारी

गोवा : अवैध वास्तव्य करणार्‍या बांगलादेशींना परत पाठविणार - मुख्यमंत्री सावंत

पणजी; पुढारी वृत्तसेवा :  केंद्र सरकारतर्फे देशभरात अवैध पद्धतीने राहणार्‍या बांगलादेशींविरुद्ध मोहीम सुरू असताना राज्य सरकारनेही अशी मोहीम सुरू केली आहे. यामध्ये सापडलेल्या सर्व बांगलादेशींना परत बांगलादेशात पाठविणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. येत्या दिवसांत ही मोहीम अधिक कडक पद्धतीने राबविली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, विधानसभा अधिवेशनात भाडेकरू ओळख विधेयक संमत झाले होते. पोलिसांनी संपूर्ण गोव्यात भाडेकरू तपासणी सुरू केली होती. त्यावेळी स्क्रॅपयार्ड किंवा अन्य अवैध धंदे करणार्‍या काहीजणांकडे भारतातील पत्ता नसल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्याकडे भारतीय ओळखपत्र, मतदान कार्डही नव्हते. यातील अनेकजण गावामध्ये खोल्या घेऊन भाड्याने राहत असल्याचे समजले.
पोलिस पडताळणी केल्याशिवाय कुणालाही भाड्याने खोली देऊ नये. कारण अनेक अवैध धंद्यामध्ये आणि गुन्ह्यांमध्ये असे ओळख लपवलेले भाडेकरू असल्याचे उघड झाले आहे. आपण ज्याला भाड्याने ठेवणार आहोत तो कुठून आला आहे, तो कोणते काम करतो याची माहिती मालकांना आणि पोलिसांना असणे आवश्यक आहे. अवैध बांगलादेशींविरुद्ध गोवा पोलिसांचे विविध विभाग काम करत आहेत. नागरिकांनी अशा व्यक्तींबद्दल माहिती असल्यास पोलिसांना कळवून सहकार्य करावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

आधार कार्डबाबत केंद्रीय गृहखात्याला अहवाल

अटक केलेल्या एका बांगलादेशी नागरिकांकडे भारताचे आधार कार्ड होते. याबाबत मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, आधार कार्ड बनविण्याचे काम एका खासगी कंपनीला दिले आहे. त्यामुळे कोणीही आधार कार्ड बनवत आहे. याबाबत अटक केलेल्या नागरिकांच्या आधारकार्डबाबतचा अहवाल केंद्रीय गृह खात्याला पाठविला आहे.

मडगावात चार बांगलादेशी ताब्यात

मडगाव : ओरली येथे भंगार अड्ड्यावर रविवारी आणखी चार बांगलादेशींना ताब्यात घेण्यात आले. शाहीन फझल करीम (वय 40) आणि करीम फझल करीम (वय 50) अशी त्यांची नावे असून बांगलादेशातील नारायणगंज या तालुक्यातील ते रहिवासी आहेत. हे दोघेही भाऊ असून ते ओर्ली येथे फिलिप ते फर्नांडिस यांच्या मालकीच्या भंगार अड्ड्यावर काम करत होते. त्यांच्या बरोबर सिमुल (वय 8) आणि जिहात (वय 6) ही दोन अल्पवयीन मुलेही सापडली आहेत. अजून यापैकी कोणालाही अटक केलेली नाही; मात्र त्यांना त्यांच्या घरातच नजरकैदेत ठेवल्याची माहिती कोलवा येथील पोलिस निरीक्षक फिलोमेन कॉस्टा यांनी दिली.

‘त्या’ मालकांची चौकशी होणार

मुख्यमंत्री म्हणाले की, आतापर्यंत अवैध पद्धतीने राहणार्‍या वीस बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. त्यांना खोली भाड्याने देणार्‍या मालकांनी कोणतीही पोलिस पडताळणीकरून घेतली नव्हती. त्यामुळे त्यांनी भाडेकरू कधी व का ठेवले होते? त्यांना ते अवैधरीत्या राहत असल्याबाबत माहिती होती का? याचीही चौकशी केली जाणार आहे.

Back to top button