गोवा : ‘पीएफआय’चा म्होरक्या अनिस कर्नाटकात जेरबंद | पुढारी

गोवा : ‘पीएफआय’चा म्होरक्या अनिस कर्नाटकात जेरबंद

पणजी; पुढारी वृत्तसेवा : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) चा सक्रिय कार्यकर्ता तथा पीएफआय संघटनेचा राष्ट्रीय सरचिटणीस असलेल्या अनिस अहमद याला कर्नाटक राज्यातील शिरसी येथे अटक करण्यात आली. बायणा (गोवा) येथे राहणारा अनिस अहमद कर्नाटकातून केरळ राज्यात पसार होण्याच्या बेतात असतानाच राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) कर्नाटक पोलिसांच्या सहकार्याने त्याला गुरुवारी रात्री उशिरा अटक केली. महत्त्वाचे म्हणजे दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याप्रकरणी व देशात दंगे भडकावण्याचे षड्यंत्र रचल्याप्रकरणी ज्या संघटनेच्या नेत्यांची धरपकड सुरू आहे, त्या संघटनेचा सरचिटणीस असलेला अनिस गोव्यात राहत होता. याबाबत त्यांच्या शेजार्‍यांनाही काहीच माहिती नव्हती.

एनआयएने दहशतवाद्यांना पैसा पुरवणे, देशात अशांतता निर्माण करून दंगे भडकावण्याचे षड्यंत्र रचणे आदी आरोपाखाली देशभरातील पीएफआयच्या 106 सक्रिय कार्यकर्त्यांना व संघटनेचा प्रमुख ओमा सालम याला अटक केली आहे. त्यांच्याकडून मुरगाव तालुक्यातील बायणा येथ राहात असलेल्या पीएफआयचा सरचिटणीस व गोवा राज्यात पीएफआ?यचे काम पाहणार्‍या अनिस याची माहिती मिळाली. त्यानंतर एनआयएने इतर विविध तपास यंत्रणांच्या सहकार्याने गोव्यात गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास बायणा येथील अनिसच्या घरावर छापा टाकला. मात्र तो सापडला नाही. त्या ऐवजी त्याचे नातेवाईक सापडले. शुक्रवारी पथकाने त्याला शिरसी येथे अटक केली. आयकर विभाग, केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभाग ( सीबीआय ), केंद्रीय महसूल गुप्तचर ( डीआरआय), संचालनालयाच्या नार्कोटिक कंट्रोल ब्यूरो ( एनसीबी ) या यंत्रणांचे अधिकारीही बायणा येथील छाप्यावेळी उपस्थित होते.अनिसचा देशविरोधी कारवाया दक्षिण भारतात प्रामुख्याने सुरू होत्या. त्याबाबत एनआय सखोल तपास करीत आहे.

Back to top button