गोवा : वास्कोत भाजी मार्केट रस्त्याने घेतला मोकळा श्वास | पुढारी

गोवा : वास्कोत भाजी मार्केट रस्त्याने घेतला मोकळा श्वास

वास्को;  पुढारी वृत्तसेवा :  भाजी मार्केटात विक्रेत्यांनी रस्त्यावर केलेली अतिक्रमणे व अडथळे वास्को पोलिसांनी सोमवारी हटविल्याने वास्कोवासीयांनी वास्को पोलिसांचे अभिनंदन केले आहे. वास्को पोलिसांच्या या कामगिरीमुळे मुरगाव पालिकेने सारवासारव करून वेळ मारली. मात्र, मुरगाव पालिकेच्या एकंदर कामाची वास्कोवासीयांना जाणीव असल्याने नागरीक पालिकेकडून रस्त्यावरील अतिक्रमणे व अडथळे हटविण्यासंबंधी अपेक्षा करीत नसल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. दरम्यान, आम्ही लवकरच मोहीम हाती घेऊन भाजी मार्केटातील विक्रेत्यांमध्ये शिस्त आणणार असल्याचे नगराध्यक्ष लिओ रॉड्रिग्ज यांनी सांगितले.

मुरगाव पालिकेचा कारभार सुस्त झाल्याने व विक्रेते मुरगाव पालिकेला जुमानत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. भाजी मार्केटातील बहुतांश विक्रेत्यांनी दुकानासमोरचा रस्ता त्यांनी विकत घेतला असे वागत आहेत. दुकानात माल ठेवण्याऐवजी समोरचा अर्धाअधिक रस्ता अडवून मालविक्री करण्यात येते. त्याचप्रमाणे दुकानासमोर प्लास्टिक कापड बांधण्यात आले आहेत. एकंदर या कारणास्तव ग्राहकांना अक्षरशः एकमेकांना धक्के मारत पुढे जावे लागते. याप्रकरणी मुरगाव पालिकेकडे काहीजणांनी तोंडी तक्रारी करूनसुद्धा पालिका अधिकारी कारवाई करण्यास राजी नाही. यामागील कारण गुलदस्तामध्ये आहे.पालिका व विक्रेते यांच्यामध्ये अलिखित सामंजस्य करार झाल्याच्या चर्चा ऐकण्यास मिळत आहे.

भाजी मार्केटात विक्रेत्यांनी रस्त्यावर केलेल्या अतिक्रमण व इतर गोष्टींसंबंधी वास्कोचे पोलिस निरीक्षक कपिल नायक यांनी दखल घेताना सोमवारी कारवाई केली. त्यांनी उपनिरीक्षक मयुर यांच्यासह एक हवालदार, एक शिपाई यांना भाजी मार्केटामध्ये पाठवून तेथील अतिक्रमणे दूर केली. पोलिसांनी रस्त्यावर मांडण्यात आलेली खोकी व इतर गोष्टी हटविण्यास सांगितले. त्यामुळे अवघ्या दहा मिनिटांत रस्त्यावरील अतिक्रमणे दूर झाली. पोलिसांच्या या कारवाईबद्दल काहीजणांनी तेथेच पोलिसांचे कौतुक केले. पोलिसांनी अशी कारवाई चालूच ठेवावी, अशी विनंती केली.

संबंधित बातम्या

पोलिसांचे कौतुक होत असल्याने मुरगाव पालिका अडचणीत आली. त्यामुळे आम्हीच पोलिसांना सदर अतिक्रमणे हटविण्यास सांगितले होते, अशी सारवासारव नगराध्यक्ष रॉड्रिग्ज यांनी केली. पालिका निरीक्षक यांना मतदार यादी संबंधी बूथस्तरीय अधिकारी म्हणून काम देण्यात आल्याने तेथील अतिक्रमणे हटविण्यास विलंब लागत आहे. आम्ही अतिक्रमणाकडे लक्ष देऊ शकत नसल्याचे स्पष्टीकरण दिले. तथापि, त्या स्पष्टीकरणात काहीच दम नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.

Back to top button