गोवा : दक्षिणेतील ‘कर्लिस’वर कारवाई कधी होणार?

गोवा : दक्षिणेतील ‘कर्लिस’वर कारवाई कधी होणार?

मडगाव; विशाल नाईक : समुद्र किनार्‍यावर सीआरझेड (कोस्टल रेग्युलेशन झोन) तीनमधील 'नो-डेव्हलपमेंट झोन'मध्ये बेकायदेशीर बांधकाम केल्याबद्दल उत्तर गोव्यातील कर्लिस बार आणि रेस्टॉरंट पाडण्यास प्रारंभ झाला आहे. असे अनेक बार आणि रेस्टॉरंट दक्षिण गोव्यातही आहेत. त्यांनीही बेकायदा बांधकाम केल्याची चर्चा आहे. कर्लिसवरील कारवाईमुळे त्यांचेही धाबे दणाणले आहेत. खोला, काब दे राम तसेच असोळणा भागात चक्क किनार्‍यावर शॅक्स वजा हॉटेल्स सर्रास सुरू आहेत. या हॉटेल्सवर ताबडतोब करवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

काब दे राम किनार्‍यावर सीआरझेड नियमाचा भंग करून हॉटेल उभारण्यात आले आहे. केवळ पर्यटन हंगामात हे हॉटेल चालू असते. त्यानंतर पावसाळ्यात समुद्राच्या लाटा थेट या हॉटेलमध्ये येत असल्याने हे हॉटेल बंद ठेवले जाते. सध्या जरी हॉटेल बंद असले तरीही मान्सून संपताच पुन्हा हॉटेल सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. समुद्राच्या भरती रेषेपासून अडीचशे मीटरमध्ये बांधकाम करता येत नाही. पण, या प्रख्यात हॉटेलला चक्क समुद्राच्या अगदी जवळ आणि तेही खोल दरीत परवानगी कशी मिळाली, हा मोठा प्रश्न आहे. स्थानिक पंचायतीवर निवडून आलेले पंच आपल्याला काहीच माहिती नाही, असे सांगतात. पूर्वीच्या पंचायत मंडळाला विचारा, असे उत्तर त्यांच्याकडून देण्यात आले आहे. समुद्राला लागून असलेल्या या हॉटेलला पर्यटन खात्याचा परवाना प्राप्त आहे. पाच वर्षांपासून सदर हॉटेल येथे सुरू आहे. डिस्को हा प्रकार केवळ उत्तर गोव्याच्या किनारपट्टी भागात चालतो असा समज होता; पण या हॉटेलमध्ये गुपचूपपणे डिस्को चालवला जातो. रात्रभर कर्णकर्कश आवाजात संगीत वाजवले जाते. गावातील लोक भोळे आहेत. त्यांना या आवाजाचा त्रास होतो; पण या हॉटेलला मोठ्या राजकारण्यांचा वरदहस्त असल्याने कोणीही त्याविरुद्ध आवाज उठवायची हिंमत दाखवत नाही, अशी माहिती रमाकांत गावकर यांनी दिली.

सासष्टीत आणि खास करुन मोबोर आणि केळशी भागांतील पंचतारांकित हॉटेल्सनी आपला विस्तार समुद्र किनार्‍यापर्यंत केला आहे. सध्या समुद्र किनार्‍यावर वेडिंग डेस्टिनेशनची क्रेज आहे. तीच संधी साधून पंचतारांकित हॉटेल्सनी समुद्र किनारा काबीज करण्यास सुरू केले आहे. वेडिंग डेस्टिनेशनची जाहिरातबाजी गोव्याबाहेर केली जात असून, समुद्र किनार्‍यावर विवाह सोहळा आयोजित करण्याआठी वेडिंग इव्हेंटवाले या हॉटेल्सना सांगेल ती किंमत द्यायला तयार असतात. सीआरझेडच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर विवाह सोहळे आयोजित होऊ लागले आहेत. केळशी येथील शॅक्स मालक मिलाग्रीस नोर्‍होना यांनी दै. 'पुढारी' जवळ बोलताना पंचतारांकित हॉटेल्कडून कायदा धाब्यावर बसवून सीआरझेडच्या क्षेत्रात तात्पुरती बांधकामे उभारुन विवाह सोहळे आयोजित केले जात आहेत. दिवाळीत मोबोर आणि केळशीत अशा स्वरूपाचे अनेक विवाह सोहळे अयोजित केले जाणार आहेत. या विवाह सोहळ्याचा फटका सामान्य शॅक व्यवसायिकांना बसणार आहे. कोरोनामुळे शॅक व्यवसाय तोट्यात आलेला आहे. त्यात आता पंचतारांकित हॉटेल्सकडून किनार्‍यावर पार्ट्या आयोजित होऊ लागल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ येणार.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news