धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटालाच मिळणार : नारायण राणे | पुढारी

धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटालाच मिळणार : नारायण राणे

पणजी : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचा चांगला समन्वय जमलेला असून शिवसेना आणि भाजपचे सरकार चांगले काम करत आहे. त्यांचा संसार चांगला चालणार आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना असून धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह त्यांनाच मिळणार आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना फारच तळाला पोहोचली आहे. विनायक राऊत यांच्या सारख्यांना शिवसेनेची बाजू मांडावी लागत आहे. यासारखी अधोगती नाही, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज (दि.१०) येथे केली.

पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत राणे बोलत होते. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेश भाजपा अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, खासदार विनय तेंडुलकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी राणे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रात गेल्या आठ वर्षात केलेल्या भरीव कामामुळे यावेळी मागील वेळीपेक्षा लोकसभेच्या १०० जागा जास्त येतील. आपल्याकडे दक्षिण गोवा आणि दक्षिण मुंबई अशा दोन मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. या दोन्ही ठिकाणी आपण यश मिळवणार आहे. गोव्यातील दोन्ही जागा भाजपला मिळतील, असा दावाही राणे यांनी केला.
अतिरेकी याकूब मेमन याच्या कबरीचे नूतनीकरण उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना करण्यात आले आहे. त्यांचे ते पाप त्यांना त्रासदायक ठरत असल्यामुळे दुसऱ्यावर ते आपले पाप ढकलत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेचा फायदा भाजपला जास्त होणार आहे. कारण राहुल गांधी यांना काँग्रेसचे लोकच आपला नेता मानत नाहीत. काँग्रेस संपत चालली आहे, असेही ते म्हणाले.

गोव्यामध्ये २०० कोटींचे लघु आणि सूक्ष्म उद्योग कौशल्य प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहेत. आपल्या खात्याच्या विविध योजनांचा लाभ गोवेकरांना देण्यात येणार आहे. गोव्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सरकारचे काम चांगले चालले आहे. त्यामुळे गोव्यातील दोन्ही जागांवर १०० टक्के भाजपचाच विजय होईल, असा विश्वास राणे यांनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचलंत का ? 

Back to top button